भारत 2032 च्या ऑलिम्पिकसाठी दावेदार ?

0

नवी दिल्ली । भारताने 2032 मध्ये होणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. क्रीडा मंत्रालयाने यांसदर्भात सर्व चाचपणी करुन त्याचा आढावा घेणार आहे. भारताला 2032 मधील ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी मिळाल्यास क्रीडाक्शेत्रातील हा जागतिक कुंभमेळा राजधानी दिल्लीत भरु शकतो. दिल्लीमध्ये विविध जागतिक स्पर्धांच्या जोडीने 1982 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा आणि त्यानंतर 2010 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. देशाला खेळांमधील महाशक्ती बनवण्यासाठी ऑलिम्पिक स्पर्धेचेे आयोजन करण्याची शिफारस भारतीय ऑलिम्पिक संघटनेने केंद्र सरकारला केली होती. ऑलिम्पिक संघटनेच्या या शिफारसीवर क्रीडा मंत्रालयाने पुढची पावले उचलली आहेत. क्रीडा मंत्रालय त्यासाठी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाचा खर्च, नफा-नुकसान याचा आढावा घेऊन त्याचा अहवाला सरकारला देणार आहे. त्यानंतर ऑलिम्पिकच्या यजमानपदाच्या दावेदारीबाबत निर्णय घेतला जाईल. 2030 मध्ये देशात आशियाई क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याचा प्रस्तावही विचाराधीन आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटना 2032 च्या यजमान शहराचे नाव 2025 मध्ये जाहिर करणार आहे. यजमानपदाच्या दावेदारीसाठी नऊ वर्ष आधीपासून सुरुवात होते. त्यामुळे या शर्यतीत उतरायचे की नाही याचा विचार करण्यासाठी सरकाराकडे काही महिन्यांचा अवधी आहे.

आयोजनाबाबत अनास्था
गेल्या काही वर्षांपासून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेला वेगळ्याच समस्येचा सामना करावा लागत आहे. ऑलिम्पिक स्पर्धा तोट्याचा विषय ठरत असल्यामुळे अनेक देश यजमानपदाच्या शर्यतीतून माघार घेत असल्याचे पहायला मिळते. 2024 सालच्या ऑलिम्पिक यजमानपदाच्या शर्यतीत सुरुवातीला हॅम्बुर्ग, रोम, बुडापेस्ट, पॅरीस आणि लॉसएंजेलिस या शहरांचा समावेश होता. पण आता फक्त पॅरीस आणि लॉसएंजेलस शर्यतीत उरले आहे. एका शहराला शक्यतो दोन वेळा यजमानपद देऊ नये असा ऑलिम्पिक संघटनेच अलिखीत नियम आहे. त्यामुळे 2024 साली पॅरिसला पंसती देण्यात आली आहे.

तंबाखूवर विशेष कर
मॉट्रेंयलमध्ये 1976 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी निरनिराळ्या बांधकामासाठी केलेला खर्चात सुमारे 922 दशलक्श डॉलर्सची वाढ झाली होती. ही तूट भरुन काढण्यासाठी त्यानंतर देशात तंबाखूवर विशेष कर लावण्यात आला. सुमारे 30 वर्षानंतर 2006 मध्ये ही तूट भरुन आली. 2004 मध्ये ऑलिम्पिक आयोजीत करणार्‍या ग्रीसची अर्थव्यवस्था स्पर्धेमुळे कोलमडून पडली आहे. ऑलिम्पिकसाठी तयार करण्यात नवीन बांधकामे आता तशीच पडून आहेत.

स्टेडियममध्ये चोर्‍या
2016 मध्ये झालेले रिओ ऑलिम्पिक आतापर्यंतचे सर्वात महागडे ऑलिम्पिक होते. या स्पर्धेच्या आयोजनामुळे आता ब्राझिललाही मोठ्या तूटीचा सामना करावा लागत आहे. जगभरातील क्रीडाप्रेमींचे आकर्षण ठरलेले मरकाना स्टेडियमची आता मोठी दुरावस्था झाली आहे. या स्टेडियममधील अनेक गोष्टींची एकतर तोडफोड करण्यात आली आहे किंवा त्या चोरीस गेल्या आहे. ऑलिम्पिकसाठी तयार करण्यात आलेल्या जलतरण तलावाच्या इमारतीत आता दोन शाळा भरवल्या जातात.

हॅम युनायटेडचे मुख्यालय
लंडनमध्ये 2012 मधील ऑलिम्पिकसाठी तयार करण्यात आलेले स्टेडियम आता इंग्लिश प्रिमिअर लीगमधील हॅम युनायटेड या फ्रॅचायझीचे मुख्यालय झाले आहे. अशी परिस्थिती थोड्याफार फरकाने चीनमध्ये आहे. चीनमध्ये 2022 मध्ये हिवाळी ऑलिम्पिक रंगणार आहे. चीनने या स्पर्धेच्या तयारीच्या खर्चात मोठी कपात करताना विविध सहा शहरांमध्ये स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. 2008 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेल्या बर्ड्स नेस्ट स्टेडियममध्ये हिवाळी ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा आणि समारोप समारंभ होणार आहे. ऑलिम्पिकसाठी बांधलेल्या वॉटर क्युब या जलतरण स्टेडियममध्ये हिवाळी ऑलिम्पिकसाठी त्यांनी आईस क्युबची निर्मिती केली आहे.