भारनियमनाचा प्रवेशप्रक्रीयेला फटका

0

नाशिक । कधी तुटवड्याचे कारण तर कधी तांत्रिक बिघाडाच्या नावाखाली महावितरणकडून अघोषित भारनियमन करून ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेत अडसर येतो आहे. अकरावी व बारावीचा निकाल जाहीर झाल्याने उच्चशिक्षणाच्या प्रवेशप्रक्रियाही सुरू आहेत. वीज गेल्यानंतर अडचण येऊ नये म्हणून बॅटरीची पर्यायी सोय करणे सर्वच शाळांना शक्य नसल्याने पालकांचाही वेळ विनाकारण वाया जातो आहे.

विद्यार्थ्यांमधून तीव्र नाराजी
महावितरणकडून होत असलेल्या अनियमित भारनियमनामुळे ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेत अडसर निर्माण होत असल्याने विद्यार्थ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. बारावीच्या गुणपत्रिका हातात मिळाल्यानंतर विविध विद्याशाखांच्या ऑनलाइन प्रवेशासाठी अर्ज भरणार्‍या विद्यार्थ्यांचा ओघ वाढला असून, यावर्षापासून पहिल्यांदाच अकरावीची प्रवेशप्रक्रियाही ऑनलाइन करण्यात आल्याने ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेत मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व्यस्त आहेत. नाशिकसह विभागातून हजारो विद्यार्थी अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शक्यता असून, अशा विद्यार्थ्यांसाठी इंजिनिअरिंगची 46 व फार्मसीची 38 सुविधा केंदे्र सुरू करण्यात आली आहेत. शहरातील सुमारे दीडशेहून अधिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू असताना शहरात विजेचा खेळखंडोबा सुरूच असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करताना अडचणी येत आहेत. थोड्याफार फरकाने राज्यात सर्वत्र हीच बोंब कायम असल्याने डीजिटल कारभारावर टीका होत आहे.