भुसावळ । विद्युत निर्मिती केंद्रापासून 5 किलोमीटर परिसरात भारनियमन मुक्त करण्याची तरतुद असताना देखील भुसावळ परिसरात भारनियमन सुरुच आहे. सध्या पावसाळा सुरु आहे. तरी देखील भारनियमनाचा त्रास जाणवत आहे. उन्हाळ्यात तर हा त्रास वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे राज्यात वीज प्रकल्पाजवळील परिसर भारनियमनमुक्त करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका प्रमुख समाधान महाजन यांच्या नेतृत्वात जिल्हा उपसंघटक विलास मुळे, शिक्षकसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्राचार्य विनोद गायकवाड, उपतालुका प्रमुख हिरामण पाटील, मनोहर बारसे, प्रा.धिरज पाटील, देवेंद्र पाटील, दत्तु नेमाडे, शरद जोहरे, किशोर शिंदे, बबलू बर्हाटे, अजय पाटील, निलेश महाजन, लोकेश ढाके, सोनी ठाकुर, अबरार खान, गोकुळ बाविस्कर, हेमंत बर्हाटे, युवासेना शहर सरचिटणिस सुरज पाटील, सुरेंद्र सोनवणे, निलेश ठाकुर, किशोर पाटील, हर्षल पाटील, राजेश ठाकुर, अंसार शाह, पिंटू भोई, शांताराम कोळी, सुनील भोई यांच्या सोबत असंख्य शिवसैनिक पाठपुरावा करत आहे.
त्रास सहन करुनही वितरणकडून फायदे मिळेना
विद्युत निर्मिती केंद्रापासून 5 कि.मी.चा परिसर भारनियमन मुक्त करावा असा निर्णय महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या 2011 मध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. भुसावळ दीपनगर विद्युत प्रकल्पामुळे प्रसिध्द असले तरी त्याचे परिणाम नागरिकांना भोगावे लागत आहे. हे परिणाम जेथे औष्णिक विज निर्माण केली जाते तेथे सारखेच आहे. प्रकल्पासाठी जमीन द्यायची, शासनाने नोकरीत सामावून घ्याचे नाही, प्रदूषण प्रकल्पाच्या परिसरातील नागरिकांनी सहन करायचे, तसेच याच नागरिकांचे पाणी प्रकल्पासाठी पळवायचे म्हणून प्रकल्पाच्या 5 कि.मी. परिसरातील नागरिकांना स्वस्तात विज देण्याची मागणी जोर धरु लागली. त्यातच भारनियमन होत असल्याने किमान या क्षेत्राला भारनियमन मुक्त करावे अशी मागणी शिवसेनेने केली आहे. यासंदर्भात प्रा. धिरज पाटील वारंवार विज वितरणला हि बाब लक्षात आणून दिली आहे.
विधीमंडळात प्रश्न मांडण्याचा आग्रह धरणार
राज्यात आघाडी सरकार सत्तेत असतांना 2005 मध्ये शासनाने ग्रामिण भागासाठी अक्षय प्रकाश योजना आणली होती. या अंतर्गत गावात सिंगल फेज वापरला जात असे. या योजनेमुळे काही वीजेच्या भारनियमनाचे चटके काही अंशी कमी झाले होते म्हणूनच मंत्रालयापर्यंत पाठपुरवा करु व हिवाळी अधिवेशनात प्रश्न मांडण्यासाठी प्रयत्न करु असे शिवसेना तालुका प्रमुख समाधान महाजन यांनी कळवले आहे. पावसाळा सुरु असूनही समाधानकारक पाऊस होत नाही. त्यातल्या त्यात उन्हाची तीव्रता अधिक असल्यामुळे जेमतेम पडलेल्या पावसाचा ओलावा जमिनीत टिकून राहत नाही. त्यामुळे शेतकर्यांना आपले पीक टिकविण्यासाठी पाणी द्यावे लागत आहे. काही शेतकर्यांनी पिकांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला आहे. मात्र भारनियमानामुळे विज पुरवठा खंडीत होत असून पिके टिकवायची तरी कशी असा प्रश्न उभा ठाकला आहे.