मुक्ताईनगर । बहुजन समाजाच्या न्याय्य हक्कांच्या 14 मागण्यांसाठी भारिप बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष संजय कांडेलकर यांनी आमरण उपोषण सुरु केले होते. तहसिल प्रशानाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली. येथील तहसिल कार्यालयाजवळ 20 मार्च पासून 14 मागण्यांसाठी भारिप बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष संजय कांडेलकर यांनी आमरण उपोषण सुरु केले होते. त्यांच्या सोबत पक्षाचे पदाधिकारीही उपस्थित होते.
दरम्यान दुपारी तहसिलदार कुंवर यांनी उपोषणस्थळास भेट देऊन कार्यवाहीबाबत तसेच उपोषण सोडणेसंदर्भात चर्चा केली. त्यानंतर नायब तहसिलदार शांताराम चौधरी यांनी सरबत पाजून उपोषणाची सांगता केली. व तहसिलदार यांनी प्रत्येकी मागणीची कार्यवाही केली असल्याचे भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांना कार्यालयाने प्रत्येक संबंधित विभागाशी केलेल्या पत्रव्यवहारांच्या छायांकित प्रती उपोषणस्थळी वाचून दाखविल्या तसेच लेखी पत्र दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष दिनेश इखारे, जिल्हासंघटक विश्वनाथ मोरे, संजय धुंदले, गुरचळ, नरेंद्र तायडे, भिकाजी आसलकर, देविदास कोळी, नंदू वाघ, समाधान थाटे, साहेबराव धुंदले, प्रमोद भालेराव, बाळू इंगळे, संजय कोळी यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.
अडचणींची करुन दिली जाणीव
तालुक्यातील बहुजन समाजाला विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात भारिप बहुजन महासंघातर्फे वारंवार तहसिल प्रशासनास लेखी व तोंडी स्वरुपात मागण्या सादर केल्या होत्या. परंतु याकडे प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शेवटी भारिप बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष संजय कांडेलकर यांनी तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले होते. या उपोषणामुळे प्रशासनाला जाग येऊन त्यांनी मागण्या मान्य केल्या आहेत.