भारिपतर्फे भुसावळात घंटानाद आंदोलन

0

मुक्ताईनगरासह यावल शहरात तहसील प्रशासनाला भारिपने दिले मागण्यांचे निवेदन

भुसावळ:- भीमा-कोरेगाव हल्ल्याचे प्रमुख सुत्रधार मनोहर कुळकर्णी उर्फ संभाजी भिडे यांना त्वरीत अटक करावी यासह अ‍ॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक करावा यासह विविध मागण्यांसाठी भारिपतर्फे भुसावळ तहसील कार्यालयाबाहेर मंगळवारी घंटानाद आंदोलन करण्यात आले. मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले तर मुक्ताईनगरासह यावल येथेही मागण्यांबाबत तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

अशा आहेत आंदोलकांच्या मागण्या
सर्वोच्च न्यायालयात अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट कडक करण्यासाठी पुनर्विचार याचिका दाखल करावी, भीमा-कोरेगाव हल्ला प्रकरणातील बहुजन बांधवांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत, ओबीसी, व्ही.आय.एन.टी., एस.बी.सी. विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती द्यावी, एस.सी./एस.टी.विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती तत्काळ अदा करावी, टी.आय.एस.एस.विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात, शेतकर्‍यांचा 7/12 कोरा करा, भुसावळ संत गाडगेबाबा नगर परीषद दवाखाना येथे कायमस्वरूपी डॉक्टरांची व्यवस्था करावी व तेथे शवविच्छेदनाची सोय करावी, उन्हाळा सुरू होण्याआधीच पाणीटंचाई भुसावळकरांना भासू लागली आहे म्हणून तापी नदीवर तात्पुरता बंधारा बांधण्याऐवजी कायमस्वरूपी 10 ते 12 फुट उंच व 6 ते 7 फुट रुंदीचा बंधारा बांधण्यात यावा, शिरपूर-कन्हाळे रोड येथील वाढीव भाग नगरपालिकेत आलेला आहे तेथे स्ट्रीट लाईट, रस्ते, गटारींची कामे व्हावेत आदी मागण्या करण्यात आल्या. घंटानाद आंदोलनात भारिपचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, तालुकाध्यक्ष अ‍ॅड.मनोहर सपकाळे, जिल्हा उपाध्यक्ष दिनेश इखारे, सचिन वानखेडे, शहराध्यक्ष गणेश इंगळे आदी सहभागी झाले.

यावल तहसीलदारांना निवेदन
यावल शहरातही भारिपतर्फे तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आले. भीमा-कोरेगाव हल्ल्यातील गुन्हे मागे घ्यावेत, टीआयएसएस विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात, शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करावा यासह अन्य मागण्यांचे निवेदन शहराध्यक्ष शे.तसलीम शे.गनी यांच्यासह प्रशांत तायडे, किरण तायडे, जिल्हा मार्गददर्शक सीताराम पारधे , शे.मुस्ताक शे.हुसेन, कलीम जुम्मा शाह आदींच्या उपस्थितीत देण्यात आले.

मुक्ताईनगरातही घंटानाद आंदोलन
भीमा कोरेगाव प्रकरणी संभाजी भिडे गुरुजी यांना अटक करावी व बहुजनांवर दाखल गुन्हे मागे घेण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी तालुका भारिप बहुजन महासंगाच्या वतीने मंगळवारी सकाळी 11.30 वाजता येथील तहसील कार्यालयात घंटानाद आंदोलन करून प्रशासनाला निवेदन देण्यात आले. भारिप बहुजन महासंघाचे तालुका अध्यक्ष संजय कांडेलकर यांच्या नेतृत्वाखाली हे घंटानाद आंदोलन करण्यात आले. प्रसंगी नायब तहसीलदार सोनार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना विश्वनाथ मोरे, सुरेश ससाणे, दिलीप पोहेकर, समाधान गवई, संजय धुंदले, कौस्तुभ शिंदे, पुनाजी इंगळे, शरद धुंदले, प्रवीण पांडव, दीपक जाधव, रामभाऊ निकम, प्रमोद भालेराव, संजय कोळी, एस.एस.भालेराव, भिवाजी तायडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.