औरंगाबाद : भारिप-बहुजन महासंघ आणि एमआयएममध्ये युती झाली असून दोन्ही पक्षांनी विधानसभा निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या युतीची घोषणा येत्या २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती दिनी एका जाहीर सभेद्वारे करण्यात येणार आहे.भारिप आणि एमआयएम यांची युती झाल्याने राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केलीय.
भारिप-बहुजन महासंघ आणि एमआयएम यांच्यात युती होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. या युतीसाठी प्रकाश आंबेडकर यांच्या पुण्यातील निवासस्थानी बैठकही आयोजित करण्यात आली होती. दोन बैठकात युतीचा फॉर्म्युला ठरविल्यानंतर युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांची बैठक २ ऑक्टोबरला होणार आहे. त्यानंतर सायंकाळी औरंगाबाद येथील जबिंदा लॉन्सवर युतीची पहिली जाहीर सभा होणार आहे.
एमआयएमचे आमदार इम्तियाज जलिल यांनी केवळ विधानसभाच नव्हे तर लोकसभा आणि महापालिका निवडणुकाही एकत्र लढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं. या युतीच्या निमित्ताने तब्बल ३० वर्षानंतर राज्यात पुन्हा एकदा दलित-मुस्लिम समाज राजकीयदृष्ट्या एकत्र येत आहेत. यापूर्वी पीआरपीचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी हाजी मस्तान यांच्याशी युती केली होती.