भुसावळातील पंचशील नगरात शौचालयाअभावी महिलांची कुचंबणा ; पालिका प्रशासनाच्या कारभाराविरुद्ध घोषणाबाजी ; पाण्याबाबतही विचारला जाब ; निकृष्ट शौचालयाच्या कामाची चौकशीची मागणी
भुसावळ- शहरातील पंचशील नगर भागात नव्याने शौचालयाची उभारणी करावी, यापूर्वी बांधण्यात आलेल्या शौचालयाच्या निकृष्ट कामाची चौकशी करावी, सुरळीत पाणीपुरावा करावा, अनुसूचित जाती व नवबौध्द समाज कल्याण मार्फत रमाई आवास योजनेतील जाचक अटी रद्द कराव्यात, झोपडपट्टी भागात वाढीव घरपट्टी रद्द करण्यात यावी आदी मागण्यांसाठी भारीप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या नेतृत्वात सोमवारी सकाळी गोपाळ नगरातील पालिकेच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. निवेदन देवूनही दखल घेतली जात नसल्याने पालिका प्रशासनाच्या कारभराबाबत मोर्चेकर्यांनी टिकेची झोड उठवत प्रचंड घोषणाबाजी केली तसेच मागण्यांबाबत फलकही प्रसंगी झळकावण्यात आले. नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक अख्तर खान यांना मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले.
शौचालयाअभावी महिलांची गैरसोय
पंचशील नगरात पालिकेने काही दिवसांपूर्वी महिला व पुरुष शौचालयाचे बांधकाम केले मात्र हे शौचालय हे आता पूर्णपणे जमीनदोस्त झाले असून या भागात नवीन शौचालयाची नितांत गरज आहे. याबाबत भारीपाने यापूर्वी पालिका प्रशासनाला निवेदन देवूनदखल घेण्याची मागणी केली होती तर दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशाराही दिला होता तर सोमवारी सकाळी प्रशासनाच्या कारभाराविषयी घोषणाबाजी करीत भारीरपचे पदाधिकारी व पंचशिल नगरातील नागरिक, महिला पालिकेवर धडकल्या. पालिकेच्या भुमिकेमुळे नागरिकांचे शारीरीक व मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे. पालिकेने बांधलेले शौचालय पूर्णपणे खचले असून ते जमीनदोस्त झाल्याने वापर थांबला आहे. यापूर्वी दुपारच्या वेळी बांधकाम कोसळल्याने जिवीतहानी टळली. हेच शौचालय सकाळ किंवा सायंकाळी कोसळले असते तर जिवीतहानी झाली असती, असा आरोप यावेळी भारीपसह नागरिकांनी पालिकेला दिलेल्या निवेदनातून केला.
यांचा मोर्चात सहभाग
भारीपचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, शे.हसन शेख कालू, दिनेश इखारे, दिलीप भालेराव, भीमराव तायडे, रुपेश साळुंके, संगीता भामरे, दीपाली निळे, बेबीबाई बागुल, शोभा हिवरे, जनाबाई चौधरी, वैशाली चौधरी, नंदा तायडे, वैशाली पाटील, उषाबाई सुरवाडे, सजीदाबी शेख, सैदाबी फारूक, फिरोजाबी सैय्यद, रीजवाना शेख, ताराबाई कांडेलकर, फरीदाबी शे.भिकन, नजमाबी शे.रशीद, सुरेखा अडकमोल, अर्चना तायडे यांच्यासह प्रभागातील महिलांसह नागरीक उपस्थित होते.