भालशीव-पिंपरी भागात बिबट्याची दहशत

0

वनविभागाने केले सतर्कतेचे आवाहन

यावल- सातपुडा पर्वतरांगांमध्ये वृक्षांची कत्तल झाल्याने वन्यप्राण्यांनी शेत-शिवारात आपला मोर्चा वळविला आहे. तापी नदी काठावरील भालशीव-पिंपरी या भागात बिबट्याचे दर्शन दुचाकीस्वाराला झाल्यानंतर त्याने गावात तसेच वनविभागाला कळवल्यानंतर अधिकार्‍यांनी पग मार्ग पाहिल्यानंतर ते बिबट्याचेच असल्याचे निष्पन्न झाल्याने या भागात घबराट पसरली आहे. ही पावले बिबट्याची असल्याचे यावल पश्चिमेची वनविभागाचे अधिकारी व्ही.एम.पाटील म्हणाले.

दुचाकीस्वाराला झाले बिबट्याचे दर्शन
या भागात बिबटे, वाघ, हिंस्र पशू, पक्षी, प्राणी यांनी आपला मोर्चा आता पाण्यासाठी व थंडाव्यासाठी शेत-शिवारातील बागायती क्षेत्रात वळवला आहे. बुधवार, 3 रोजी पिंप्री येथील पांडुरंग कोळी हे शेताकडे जात असताना राजू रूपचंद कोळी यांच्या शेताकडे बिबट्या जाताना दिसला. कोळी यांची बिबट्याला पाहताच भंबेरी उडाल्याने त्यांनी घरचा रस्ता धरला. पंचायत समितीचे गटनेते भाजपा दीपक पाटील यांना ही माहिती कळताच त्यांनी तत्काळ वन विभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला. यानंतर घटनास्थळावर यावल पश्चिमचे रेंजर व्ही.एम.पाटील व वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी पिंपरी भागातील राजू रूपचंद कोळी यांच्या शेतामधील केळीमध्ये बिबट्याचे ठसे उमटलेले पाहिले.

वनविभागाने केले सतर्कतेचे आवाहन
बिबट्याचा संचार असल्याच्या पार्श्‍वभूमीवर वनविभागाने गावकर्‍यांना शेतामध्ये एकटे जावू नये तसेच रात्रीच्या वेळी पाणी भरण्यासाठी जावू नये तसेच लहान मुलांना भाकरी किंवा डबे पोहोचवण्यात शेतामध्ये पाठवू नका व शेतात जाताना रात्रीच्या वेळी टेंबे वापरा, बिबट्या आढळल्यास वनविभागाशी त्वरीत संपर्क साधा, असे आवाहन केले आहे. परिसरात दर्‍याखोर्‍यांचा भाग असल्याने बिबट्याला लपण्याची खूप जागा आहे. नजीकच तापी नदी पाण्याच्या शोधार्थ बिबट्या या भागात आला असल्याची शक्यता आहे.