आमदार हरीभाऊ जावळे ; कुणा अधिकार्याने दबाव आणल्याचे म्हटल्यास संस्थाध्यक्षपदाचा राजीनामा देणार
यावल- तालुक्यातील भालोद येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शालेय पोषण आहाराच्या तांदळाच्या चोरी प्रकरणी जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर निश्चित कारवाई होणार असल्याची माहिती आमदार हरीभाऊ जावळे यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परीषदेत दिली. या प्रकरणात कुणाही अधिकार्यावर राजकीय दबाव नाही व कुणा अधिकार्याने राजकीय दबाव आणला आहे, असे म्हटल्यास संस्थाध्यक्ष पदाचा आपण लागलीच राजीनाम देवू, अशी परखड भूमिका आमदार जावळे यांनी मांडली. या प्रकरणातील रोजंदारी महिलेला निलंबित करण्यात आले असून पोषण आहाराचा ठेका रद्द करण्यात आला असल्याचेही ते म्हणाले.
नागरीकांची सतर्कता कौतुकास्पद ; संस्थेची शतकाकडे वाटचाल
भालोद सेकंडरी एज्युकेशन सोसायटीची शतक महोत्सवाकडे वाटचाल सुरू असताना शालेय पोषण आहाराची होणारी चोरी ही निश्चितच क्लेशदायक बाब असल्याचे आमदार जावळे यांनी सांगत 2 रोजी ज्या सतर्क ग्रामस्थांनी ही चोरी उघडकीस आणली त्यांचे काम कौतुकास्पद आहे, असे त्यांनी सांगत शंभर वर्षांच्या इतिहासात असे काही घडले नसल्याचे ते म्हणाले. प्रसिद्धी माध्यमांनी ‘आमदारांची शाळा’ असे वृत्त प्रकाशित केले मात्र ही शाळा काही माझी खाजगी मालमत्ता नाही, अध्यक्ष हे नामधारी पद आहे, थेट अध्यक्षांचा कुठेही संबंध येत नाही, असेही ते म्हणाले.
तांदूळ चोरीचा खोलवर तपास करून दोषींवर कारवाई होणार
पोषण आहार प्रकरणात कोणत्याही अधिकार्याला दूरध्वनी केलेला नाही व असे कुणी अधिकारी म्हणत असल्यास तत्काळ आपण संस्थाध्यक्ष पदाचा राजीनामा देवू, असे आमदार यांनी सांगत ज्या गटाला पोषण आहाराचे काम दिले आहे त्यांचे काम तत्काळ बंद करण्यात आले असून रोजंदारी महिलेला तत्काळ निलंबीत करण्यात आले आहे. सोमवारी संस्थेच्या पदाधिकार्यांची बैठक झाली त्यात दोघा मुख्याध्यापकांना बोलावण्यात आले होते. हा तांदुळ कुणी नेला, का नेला व नेण्यामागचा काय उद्देश होता? या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशा सूचना करण्यात आल्या व ही भूमिका आपल्यास सर्व संचालकांची असून लवकरच या प्रकरणाचा उलगडा होवून दोषी मग तो कुणीही असो त्यांच्यावर कारवाई होईल, असे आमदार म्हणाले. लहान मुलांचा तोंडचा घास हिरावून घेणार्यांची हयगत होणार नाही व निषक्षपातीपणे चौकशी करणार असल्याचे आमदार म्हणाले. सोशल मिडीयातून या प्रकरणाबाबत राजकारण होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परीषदेला संस्थेचे चेअरमन दिलीप हरी चौधरी, सचिव नितीन वासुदेव चौधरी, भालोद सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित संस्थेचे संचालक, भाजपाचे हिरालाल चौधरी आदींची उपस्थिती होती.