धानोरा- पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिच्या भावासह दोघांना विहिरीत फेकणार्या नराधम शेख खालीद शेख ईस्माईल (30) यास शुक्रवारी पोलिसांनी अटक केल्यानंतर शनिवारी त्यास अमळनेर न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, आरोपीच्या या कृत्यानंतर समाजातून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात असून आरोपीवर कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी होत आहे.
बोरे खावू घालण्याच्या बहाण्याने अत्याचार
धानोरा शहरातील मुस्लीम वाड्यातील रहिवासी असलेल्या आरोपी शेख खालीद शेख ईस्माईल (30) याने परीचयातीलच पाच वर्षीय चिमुकलीसह तिच्या साडेतीन वर्षीय भावास फूस लावून शेतात नेले होते. आरोपीने प्रसंगी चिमुकलीवर अत्याचार केल्यानंतर भावंडांनी ही घटना घरी सांगू, असे सांगितल्याने संशयीताने त्यांना धानोरा शिवारातील गट क्रमांक 404/अ/1 मधील अनंत बाजीराव पाटील यांच्या विहिरीत फेकले होते व पाण्यात बुडाल्याने भावंडांचा करुण अंत झाल्याची घटना गुरूवारी रात्री घडली होती. आरोपीने स्वतःच घटनेची कबुली दिल्यानंतर भावंडांचा शोध सुरू करण्यात आला मात्र आरोपी वारंवार ठिकाणे बदलत असल्याने भावंडाचा शोध लागत नव्हता मात्र त्यास पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने घटनास्थळ दाखवल्यानंतर भावंडाचा मृतदेह शुक्रवारी सकाळी 11 वाजता तब्बल 16 तासांनी बाहेर काढण्यात यश आले होते. दरम्यान, संशयीत आरोपी खालील शेखविरूद्ध महेबूबखान हबीब खान यांच्या फिर्यादीनुसार अडावद पोलिसात भादंवि 302, 363, 201 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी त्यास अमळनेर न्यायालयात हजर केले असता त्यास अधिक तपासासाठी पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक सौरभ अग्रवाल करीत आहेत.