भावपूर्ण वातावरणात दीड दिवसाच्या बाप्पांना निरोप

0

पुणे । गणपती बाप्पा मारेया… पुढच्या वर्षी लवकर या…या जयघोषांसह दीड दिवसांच्या बाप्पांना शनिवारी भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करत मोठ्या जल्लोषात शुक्रवारी गणपतींचे आगमन झाले होते. बाप्पांच्या आगमनामुळे लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वांच्या चेहर्‍यावर आनंद दिसत होता. वातावरण प्रफुल्लीत झाले होते. मात्र, शनिवारी पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देवून भाविकांनी दीड दिवसांच्या गणपतींना निरोप दिला.

…गणपती आमचा सुपर स्टार
गुलाल उधळत, टाळ मृदुंग आणि ढोल ताशाच्या गजरात, ट्वींकल ट्वींकल लिटल स्टार, गणपती आमचा सुपर स्टार, उंदिरमामा की जय, एक लाडू फुटला गणपती बाप्पा उठला, एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार..’ अशा घोषणांनी शहर शनिवारी दुमदुमून गेले होते. पावसाची रिपरिप सुरूच असल्याने नागरिकांना धावपळ करावी लागत होती. बाप्पांचे पावसापासून रक्षण करण्यासाठी त्रेधातिरपीट उडत होती.

विसर्जन घाटांवर दुपारपासूनच गर्दी
घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यासाठी नदी पात्रातील नेने आपटे घाट, पांचाळेश्‍वर घाट, पटवर्धन घाट, भीडे पुजा जवळील बापु घाट, वृद्धेश्वर व सिद्धेश्वर घाटावर मोठ्या संख्येने भाविक कुटुंबासह बाप्पाचे विर्सजन करण्यासाठी आले होते. नेने आपटे घाटात दुपारी 3 वाजल्यापासून सायंकाळी 6 पर्यंत 52 गणपती नदीपात्रात व 41 गणपती हौदात, बापु घाटात दुपारी 12 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 69 गणपती हौदात व नदी पात्रात 4 गणपतींचे विर्सजन करण्यात आले, तर वृद्धेश्‍वर घाटात 40 गणपती हौदात व 8 गणपती नदीत विर्सर्जित करण्यात आले.

जीवरक्षक तैनात
कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी विर्सजन घाटावर जीवरक्षक तैनात करण्यात आले होते. तसेच नदीची स्वच्छता राखण्यासाठी निर्माल्य कलश सुद्धा विर्सजनघाटाच्या बाहेर ठेवण्यात आले होते. उत्सवाला गालबोट लागू नये, तसेच विर्सजन मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक घाटावर पोलिस तैनात होते. यावर्षी महानगरपालिका स्वच्छतेबाबात अधिकच जागृत दिसत होती. विर्सजन घाट परिसरात व नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी प्रत्येक घाटावर पालिकेच्या 4 ते 6 कर्मचार्‍यांची टिम कचरा उचलण्यासाठी सज्ज होती.