एरंडोल । कर्जबाजारीपणामुळे भावाने गळफास घेवून आत्महत्या केल्याच्या घटनेचा मानसिक धक्का सहन न झाल्यामुळे बहिणीचे देखील हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. भावावर विखरण येथे तर बहिणीवर बाम्हणे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. चोरटक्की(ता.एरंडोल)येथील तरुण शेतकरी हरी दिगंबर पाटील या पंचेचाळीस वर्षीय शेतकर्याने काल(ता.20)नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून रिंगणगाव रस्त्यावरील शेताच्या बांधावरील निंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली होती.
हरी पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर त्यांची मोठी बहिण मंगलबाई दिनकर महाजन(वय53) याना भावाच्या निधनाचा मोठा मानसिक धक्का बसला. रात्री अचानक मंगलबाई यांची तब्येत खराब झाल्यामुळे त्यांना त्वरीत दवाखान्यात दाखल करण्यात आले.त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मात्र औषधोपचार सुरु असताना त्याना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे त्यांचाही मृत्यू झाला. मयत मंगलबाई महाजन यांचे पश्चात पती, तीन विवाहित मुली, दोन मुले असा परिवार आहे. त्यांचेवर बाम्हणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.