भावानेच केला भावाचा खून

0

बोरकुंड । दारूच्या नशेत वहिनीला शिवीगाळ संतप्त झालेल्या सख्ख्या भावानेच भावाचा काटा काढला. संतापाच्या भरात भावानेच भावाच्या डोक्यात दांडका मारून ठार केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील बोरकुंड गावात घडल्याचे तीन दिवसानंतर उघडकीस आले आहे. दरम्यान भावाचा खून केल्यानंतर मुलगा आणि सासर्‍याच्या मदतीने मृतदेह नदीत जाळून पुरावाही नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मयताच्या आत्याला आलेल्या संशयामुळे या खून प्रकरणाचा पर्दाफाश झाला आणि अवघ्या काही तासांतच तिघा आरोपींना तालुका पोलीस स्टेशनचे पीआय वसावे यांनी जेरबंद केले.

जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
मालेगाव तालुक्यातील रहिवासी असलेला गोरख अर्जून केदार (40 )हा बोरकुंड येथे सासर्‍याच्या गावी राहत होता.गोरखसोबत त्याची पत्नी, मुलगा समाधान गोरख केदार आणि भाऊ अनिल उर्फ अण्णा अर्जून केदार (30) हे राहत होते. अनिलला दारुचे व्यसन होते. सोमवारी 10 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास अनिलने दारुच्या नशेत गोरखच्या पत्नीला शिवीगाळ केली. खूप समजावून सांगून देखील अनिल ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. त्यामुळे संतप्त झालेल्या गोरखने त्याला घरात बोलवून त्याच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने वार करुन त्याला ठार मारले.10 जुलैला रात्री उशिरा गोरखने त्याचा सासरा विनायक कौतिक मोरे (68) आणि एका अल्पवयीन मुलाच्या मदतीने बोरी नदीच्या पात्रात अनिलचा मृतदेह डिझेल टाकून जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

आत्याला आला संशय
त्यामुळे आत्याला संशय आला. दरम्यान त्यांनी पोलीस स्टेशन गाठत पीआय दिवाणसिंग वसावे यांना हकीकत सांगितली. पोलीसांनी जलद गतीने तपासचक्रे फिरवली असता,संशयितांना ताब्यात घेवून कसून चौकशी केली. चौकशीअंती तिघा संशयितांवर आरोपीविरुद्ध भादंवि 302, 201,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अल्पवयीन मुलासह गोरख केदार आणि त्याचा सासरा विनायक मोरे या तिघांना पहाटे 3 वाजेच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पीआय वसावे करीत आहेत.

डिझेल टाकून अनिलचा मृतदेह जाळला
रात्री उशिरा सासरा विनायकने अल्पवयीन मुलासोबत अनिलचा मृतदेह पोत्यात भरुन बोरी नदीच्या पात्रात लाकडाचे सरणावर डिझेल टाकून मृतदेह जाळला. दरम्यान गोरखच्या आत्यामुळे खून प्रकरणाला वाचा फुटली. मयत अनिल केदारसाठी वधू संशोधन सुरु होते. तिखी (ता.धुळे) येथे राहणार्‍या अनिलच्या आत्या कासुबाई धर्मा नन्नवरे यांनी घटनेच्या दुसर्‍या दिवशी गोरख केदारला फोन करुन मुलगी पाहण्यासाठी आमच्याकडे पाठवून द्या, असे सांगितले. त्यावेळी घाबरलेल्या गोरखने अनिल नाशिकला असल्याचे सांगितले. अर्धातासातच गोरख आणि त्याची पत्नी कासुबाईच्या घरी तिखी येथे पोहोचले.