भावाला पाहताच बहिणीने मारली मिठी

0

भुसावळातील सारंग पाटलांचे दातृत्व : तपानंतर बहिणींनी पाहिला ‘प्रकाश’

भुसावळ- घरची परिस्थिती बेताचीच… त्यातच लहानपणीच कु्ररकाळाने पितृछत्र हिरावले…. अशाच घरात खाणारी तोंडे पाच, कमावता कुणी नाही… त्यामुळे खचलेल्या व मनोरुग्ण अवस्थेत वयाच्या 16 व्या वर्षीय त्याने घर सोडले. डोक्यात विचारांचे काहूर माजले असताना तो भुसावळात तो कधी आला हे त्यालाही कळले नाही. शहरातील समाजदेवक व हॉटेल व्यावसायीक सारंगधर (छोटू) पाटील यांच्या हॉटेलवर तो पोहोचला. अंगात धड कपडे नाही, पोटात अन्नाचा कण नाही, अशा अवस्थेत दाखल झालेल्या पाहुण्याचे छोटू पाटलांनी आदरातिथ्य करीत त्याला पोटभर खायला दिले, अंग झाकण्यासाठी कपडे दिले अन् हरवलेल्या तरुणाला समाजात आजही माणुसकी शिल्लक आहे याचा साक्षात प्रत्ययही आला अन् हेच आपले घर अन् माय-बाप हा चंग बांधून तो तब्बल 12 वर्ष पाटलांकडे पाहुणा म्हणून राहिला. दोन वेळच्या भाकरीसह त्याच्या कपडे-लत्त्याची व्यवस्था करण्यात आल्याने तो कधी हॉटेलमध्ये तर कधी हॉटेल परीसरात राहुन गुजराण करू लागला. काही दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील पोलिसांचा ताफा अतिरिक्त कामासाठी भुसावळात आल्यानंतर जेवणासाठी काही पोलिस कर्मचारी छोटू पाटील यांच्या ढाब्यावर आले असता त्यांनी मनोरुग्ण असलेल्या युवकाला ओळखले. ‘हा तर आपल्या गावचा ‘प्रकाश’ असे बोलही त्यांचे तोंडातून बाहेर पडले. प्रकाशच्या कुटुंबियांना तो भुसावळात असल्याची माहिती देण्यात आल्यानंतर शनिवारी त्याच्या दोघा बहिणींसह चुलत भाऊ शहरात आले. हॉटेलवर प्रकाशला पाहताच दोघा बहिणींनी त्याला मिठी मारली. रक्षाबंधनापूर्वीच बहिणींच्या आयुष्यात भावरूपी प्रकाश आल्यानंतर नकळत आनंदाळूही वाहिले त्यामुळे हा भावनिक प्रसंग पाहून उपस्थितांनाही गहिवरून आले.

छोटू पाटलांच्या रूपातून बहिणींनाही मिळाला दुसरा भाऊ
सारंग पाटलांनी आलेल्या दोघा बहिणींचे आदरातिथ्य करीत त्यांना साडी-चोळी दिली तसेच रोख रक्कमही दिली. प्रकाशप्रमाणे आता मी देखील तुमचा भाऊ आहे, भुसावळात आले तर नक्की हॉटेलवर या, असे आग्रहाचे निमंत्रणही त्यांनी दिले. यावेळी प्रकाश विजय शर्मा (वय 28) शर्माचा ताबा त्याच्या बहिणीला देण्यात आला.

आयुष्यभर भावाचा सांभाळ करणार
भाऊ मनोरुग्ण असलातरी त्याचा आम्ही आयुष्यभर सांभाळ करू, असे प्रकाशच्या बहिणी नम्रता नरेंद्र गुप्ता (नागपूर), निवेदिता राजेश शर्मा (दहिहंडा, जि.अकोला) या यांनी सांगितले. प्रकाश हरवल्यासंदर्भात पोलिसात नोंद नसल्याने पोलीस व कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून प्रकाशचा त्याची नागपूरातील बहिण नम्रता गुप्ताकडे ताबा देण्यात आला. आयुष्यभर त्याचा सांभाळ करू, असे नम्रता प्रसंगी म्हणाल्या. दरम्यान, प्रकाश कुटुंबियांना भेटल्यानंतर त्याचे पुण्यातील बहिण नमिता शर्मा, मावशी छायाताई (देऊळगाव (साकरशा), जि. बुलढाणा) यांच्या मोबाईलद्वारे व्हिडीओ कॉलींगच्या माध्यमातून बोलणेही करून देण्यात आले. प्रकाश हॉटेलवरून निघताना छोटू पाटलांसह हॉटेलमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांनादेखील गहिवरून आले.

पूत्र-वियोगाने माताही झाली वेडी
ऐन उमेदीच्या काळात पतीचे झालेले निधन त्यातच तीन मुलींचे लग्न या सार्‍या जवाबदार्‍या पार पाडताना प्रकाशने घर सोडल्याने आईलाही मोठा मानसिक आघात बसला आहे मात्र मुलगा सुखरूप असल्याने तिच्याही आनंदाला पारावर उरलेला नाही. सध्या प्रकाश आपल्या बहिणीसोबत असून लवकरच आई-मुलाची भेटही घडणार आहे.