भावाला राखी बांधण्यासाठी आतुर बहिणींची लगबग सुरु

0

जळगाव । दरवर्षी नारळी पौर्णीमेला रक्षाबंधन साजरा केला जातो. या सणाला ऐतिहासिक संदर्भ देखील आहे. असा हा पवित्र सण तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. सोमवारी 7 रोजी नारळी पौर्णीमेला रक्षाबंधन असून त्याची जोरदार तयारी सुरु आहे. बाजारात राख्या विक्रीसाठी दाखल झाल्या असून भावासाठी राखी खरेदी करण्यासाठी बहिणींनी गर्दी केली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या व फॅन्सी राख्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत.

कारवाईमुळे लागली शिस्त
प्रभारी महानगरपालिका आयुक्त जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी स्वच्छतेसह अतिक्रमणाच्या प्रश्‍नाकडे विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. गोलाणी मार्केटमधील स्वच्छतेसह अतिक्रमण त्यांनी दुर केले असून त्याच धर्तीवर फूलेमार्केट मध्ये देखील कारवाई सुरु केली आहे. त्यामुळे अतिक्रमण धारकांना शिस्त लागली आहे. रस्त्यावर न लावता, रितसर दुकाने लावण्यात आली आहे.

चिनी राख्यांना नो-एंट्री
सीमा प्रश्‍नावरुन भारत-चिनमध्ये निर्माण झालेल्या तणावपुर्ण वातावरणामुळे भारतात चिन उत्पादीत मालावर बहिष्कार घातला जात आहे. देशभरात चिनी मालावर बहिष्कार घालण्याचे आवाहन विविध संघटनेकडून होत आहे. चिन विरोधी वातावरण असल्याने सुजाण विक्रेत्यानी साहजिकच चिन उत्पादीत राख्या विक्रीसाठी ठेवलेले नसल्याचे दिसून येते. चिनी राख्यांना बाजारात कोठेही एंट्री मिळत नसल्याचे चित्र आहे.

विविध प्रकार उपलब्ध
रक्षाबंधनानिमित्त बाजारपेठेत रंगीबेरंगी राख्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. विविध आकार, रंग, छोट्या मण्यांच्या राख्या कार्टून, मोरपंखी, कुंदन, अभिनेते-अभिनेत्रींची छायाचित्रे असलेल्या राख्या, बालगणेश, मोटू-पतलु, पोकेमॉन, डोरेमॉन, देव-देवतांचे चित्र असलेल्या राख्या, बँड स्टाईल, डिस्को, लाईटींग असलेल्या राख्या अशा विविध प्रकारच्या राख्याने दुकाने सजली आहे.

असे आहेत राख्यांचे दर
साध्या राख्या 40-45 रुपये डझन
चित्रकृती राख्या 70-80 रुपये प्रति डझन
फॅन्सी राख्या 85-90 रुपये डझन
डायमंडच्या राख्या 100-110 रुपये डझन
बँड स्टाईल राख्या 200-250, 300-350 डझन
देव राख्या 10-15 रुपये