मुंबई । विश्वचषकापूर्वीपासूनच माझे आणि स्मृती मानधनाचे एक विशिष्ट बॉण्डिंग होते. विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडियात निवड होण्यासाठी दोघीही एकमेकींना प्रेरणा देत होतो. संघात निवड झाली तेव्हा आपण दोघी मराठी मुलींनी विश्वचषक गाजवायचा हे त्याचवेळी ठरवले होते. अशा एक ना अनेक आठवणी टीम इंडियाची डॅशिंग सलामीवीर पूनम राऊतने एका मुलाखतीत व्यक्त केल्या. बालपण ते टीम इंडियात निवड, ड्रेसिंग रुम ते वर्ल्ड कपचं मैदान अशा सर्व विषयावर पूनमने यावेळी सांगितल्या. मूळची बोरिवलीतील रहिवासी असलेली पूनम राऊत ही भारतीय संघातील महत्त्वाची आघाडीची खेळाडू आहे.
क्रिकेट वेगळ्या उंचीवर पोहोचणार
विश्वचषकाच्या फायनलमध्ये संपूर्ण टीम कोसळली असताना, एकटी पूनम नेटाने उभी होती. फायनलमध्ये तिच्या 86 धावांमुळे टीम इंडियाला विजयाजवळ पोहोचता आलं. मात्र विजयतिलकापासून टीम इंडिया 9 धावा दूर राहिली. याबाबत बोलताना पूनम म्हणाली, इतक्या जवळ येऊन विजय मिळू शकला नाही ही खदखद डोळ्यातील अश्रूंमधून बाहेर आली. आमच्या एका विजयाने महिला क्रिकेट वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचणार होते.
महिला क्रिकेट संघाचे भविष्य निश्चितच उज्ज्वल
आता सगळे संपले असे वाटत होते. मात्र देशवासियांनी आमच्या संघाचे, आमच्या मेहनतीचं आणि आमच्या खेळाचे केलेलं कौतुक पाहून, भारतीय महिला क्रिकेट संघाचे भविष्य निश्चितच उज्ज्वल असल्याचे समजते, असा आत्मविश्वास तिने यावेळी व्यक्त केला.