सांगवी : पिंपळे गुरव गावठाणालगत असलेले तुळजाभवानी मातेचे मंदिर परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी नवरात्रौत्सवात हजारो भाविकांची येथे दर्शनासाठी गर्दी होत असते. पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या तुळजाभवानी मातेच्या या मंदिरास तब्बल 66 वर्षांचा इतिहास आहे. कासारवाडी, पिंपळे सौदागरहून सृष्टी चौकातून पिंपळे गुरव गावठाणात प्रवेश करताना भाविकांना तुळजाभवानी मातेचे दर्शन घडते. हे मंदिर मुख्य रस्त्यालगत असल्याने येणार्या-जाणार्या शेकडो भाविकांना देवीचे दर्शन घेता येते.
पूजेची जबाबदारी कदम परिवाराकडे
1945 मध्ये तुळजाभवानी मातेचे भक्त राजाराम कदम यांनी भाऊसाहेब कदम यांच्या मालकीच्या जागेत देवीच्या छोटेखानी मंदिराची स्थापना केली. पुढे 6 फेब्रुवारी 1999 ला कदम परिवाराच्या परिश्रमातून उभारलेल्या आकर्षक मंदिरात गगनगिरी महाराज यांच्या हस्ते देवीच्या मूर्तीची भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली. 2003 मध्ये मंदिराच्यासमोर दीपस्तंभ उभारण्यात आला. देवीच्या पूजेची जबाबदारी कदम परिवाराकडेच आहे.
गेल्या वर्षी मंदिराचे नुतनीकरण
गेल्या वर्षी राजस्थान येथील कारागिरांकडून देवीच्या मंदिराचे नूतनीकरण व सुशोभिकरण करण्यात आले. समस्त पिंपळे गुरव ग्रामस्थांच्या उपस्थितीत यंदाच्या वर्षीही मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी समाजप्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन, होमहवन, देवींच्या गीतांचा कार्यक्रम, छबिना मिरवणूक आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. विविध मान्यवरांच्या हस्ते दररोज देवीची महाआरती होणार असल्याचे सुनील कदम यांनी सांगितले.