भाविकांच्या वाहनास अपघात : 10 भाविक जखमी, एक गंभीर

Devotees’ vehicle accident at Takarkheda: 10 devotees injured, one seriously यावल : शहरातील श्री स्वामी समर्थ केंद्राच्या बैठकीला आलेल्या टाकरखेडा येथील भाविकांच्या परतीच्या प्रवासात वाहनाला अपघात घडला. यात दहा भाविक जखमी झाले असून एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला तातडीने जळगाव येथे हलवण्यात आले. हा अपघात रविवारी सायंकाळी यावल-टाकरखेडा दरम्यान घडला असून अपघाताची माहिती मिळताच सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप सोनवणे यांनी अपघात स्थळावर धाव घेत जखमींना तातडीने रुग्णालयात आणून मदत केली.

परतीच्या प्रवासात अपघात
यावल येथील भुसावळ रस्त्यावर श्री स्वामी समर्थ केंद्र आहे. दर रविवारी या ठिकाणी बैठकीसाठी भाविक,भक्त ग्रामीण भागातून येत असतात. व सांयकाळी भाविक,भक्त हे गावाकडे विविध वाहनांनी जात असतात तेव्हा रविवारी सांयकाळी टाकरखेडा, ता.यावल येथील भाविक, भक्त बैठकीतून सायंकाळी एका वाहनाने घरी परत जात होते. यावल-टाकरखेडा रस्त्यावर वाहन नादुरूस्त होत त्याचा अपघात घडला. या अपघातात सकुबाई प्रकाश चौधरी (50), सरस्वतीबाई अरुण पाटील (72), मंगलाबाई मनोहर पाटील (45), नलुबाई अंकुश पाटील (45), मंगलाबाई शांताराम पाटील (55), दिनानाथ एकनाथ चौधरी (50), फुलाबाई नामदेव महाजन (45), आशाबाई भीमराव चौधरी (45), शोभाबाई सुरेश चौधरी (60) व रजनी दीनानाथ चौधरी (50, सर्व रा.टाकरखेडा) हे 10 जण जखमी झाले.

पदाधिकार्‍यांची अपघातस्थळी धाव
अपघाताची माहिती मिळताचं सरपंच संघटनेचे अध्यक्ष संदीप सोनवणे घटनास्थळी कार्यकर्त्यांसह दाखल झाले. जखमींना मिळेल त्या वाहनाने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आले. या ठिकाणी डॉ.जिशान खान, अधिपरीचारीका दीपाली किरंगे, पिंधू बागुल व स्वतः संदीप सोनवणे, रवींद्र काटकर, किरण खलसे यांनी मदत करीत जखमींवर औषधोपचार केले. सकुबाई प्रकाश चौधरी यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले आहे.