पिंपळेगुरवच्या तरुणाची पोलिसांत धाव
पिंपरी-चिंचवड : भारत मॅट्रोमनी या साईटवरून लग्नासाठी ओळख झाली. मुलाचा विश्वास संपादन करून त्याला एक लाख 60 हजार 700 रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार सांगवी येथे घडला. याबाबत नितीन जोशी (वय 31, रा. पंचरत्न नगर, पिंपळे-गुरव पुणे) या आयटी अभियंत्याने सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
‘व्हॉटस् अॅप’वरून ओळख
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन जोशी यांनी लग्नासाठी काही दिवसांपूर्वी भारत मॅट्रोमनी या साईटवर वैयक्तिक माहिती भरली होती. या माहितीच्या आधारे एका महिलेने नितीन सोबत सुरुवातीला सोशल मीडियाच्या मध्यमातून संपर्क केला. त्यातून ओळख वाढत गेली. नितीनचा विश्वास संपादन केल्यानंतर तरुणीने परदेशातून माल आला आहे. तो कस्टममधून सोडविण्यासाठी पैशांची आवश्यकता आहे, अशी बतावणी केली.
तरुण आयटी इंजीनिअर
त्यानुसार जोशी यांनी तरुणीच्या बँक खात्यावर एक लाख, 60 हजार, 700 रुपये भरले. काही दिवसानंतर नितीनने पुढील व्यक्तीला संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही. हा प्रकार 23 जानेवारी ते 18 फेब्रुवारी, 2018 दरम्यान घडला. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच नितीन जोशी या आयटी अभियंत्याने सांगवी पोलीस ठाणे गाठले.पुढील तपास सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे करीत आहेत.