भावी मुख्यमंत्री संबोधू नका, घरी बसावे लागेल!

0

जळगाव : तुमच्या जे मनात आहे, ते माझ्या मनात नाही. पण माझ्या मनातले मी अजितदादांच्या कानात सांगितल्याची टिप्पणी करतानाच, अजितदादांना सतत भावी मुख्यमंत्री म्हणत बसू नका. नाहीतर तुमच्या मागेही चौकशा लागतील आणि मग घरी बसावे लागेल, असा सल्ला भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दादांना जळगावात दिला. या माध्यमातून खडसे यांनी आपले शल्यच बोलून दाखविल्याचे मानले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि उत्तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार डॉ. सतीश पाटील यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसकडून सर्वपक्षीय गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे एकनाथ खडसे होते.

माझ्या मनातले दादांच्या कानात सांगितले : खडसे
हाच धागा पकडत एकनाथ खडसे म्हणाले, माझ्या मनातले मी अजितदादांच्या कानात सांगितले आहे. अखेर राजकीय जीवनात चढउतार हे असतात. अजितदादांबद्दल नेहमीच आदराची भावना राहिली आहे. काही नाती ही राजकारणापलीकडची असतात, तेथे गेलेच पाहिजे. अजितदादांना सतत भावी मुख्यमंत्री असे संबोधले जाते. दादा असे सतत संबोधू नका. नाहीतर चौकशा मागे लागतील आणि तुम्हाला घरी बसावे लागेल. हा नाथाभाऊ मात्र मंत्रिपदाची वाट पहात नाही. जेव्हा कुणी नव्हते तेव्हा पक्षासाठी संघर्ष केला. मात्र, काही कृतज्ञ असतात, तर काही कृतघ्न असतात, असे म्हणत आपले मनातले शल्य उघड केले.

भाजप नेत्यांची झोप उडू द्या : अजितदादा
अजित पवार म्हणाले, नाथाभाऊंनी सरकार म्हणून त्यांची भूमिका उत्तम पार पाडली. आमच्यावर आरोप झाले, त्यांच्यावरही झाले. राधेश्याम मोपलवारांची तातडीने चौकशी होते, त्यांना परत हजर करून घेतले जाते. येथे मात्र चौकशी सुरूच आहे, असे सांगत त्यांनी खडसेंच्या दुखर्‍या नसेवर बोट ठेवले. त्याचबरोबर खडसेंनी सांगितले, ते कुणाला सांगणार नाही. भाजपनेत्यांची झोप तर उडू द्या, असे म्हणत त्यांनी सस्पेन्स कायम ठेवला.