भावे हायस्कुलमधील विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

0

छत्रपती राजाराम मंडळाचा उपक्रम : 125 मुलांनी घेतला सहभाग

पुणे : चिमुकल्या हातांनी आपली कलात्मकता दाखवित मातीच्या गोळ्यातून अतिशय सुबक आणि देखणी गणेशाची मूर्ती विद्यार्थ्यांनी तयार केली. मूर्तीशास्त्राचे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी विद्यार्थ्यांचा पर्यावरणपूरक गणेश मूर्ती साकारण्याचा तास घेण्यासोबतच स्वत: देखील गणेशाची सुरेख मूर्ती साकारली. शाडू मातीची पर्यावरणपूरक मूर्ती एकाचवेळी 125 हून अधिक मुलांनी साकारून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश दिला.

सदाशिव पेठेतील छत्रपती राजाराम मंडळाच्यावतीने पेरुगेट येथील मएसो मुलांच्या भावे हायस्कूलमध्ये पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्ती बनविण्याच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पर्यावरणतज्ज्ञ जयंत गाडगीळ, मूर्तीकार वाल्मिक सुतार, सिद्धांत सुतार, मंडळाचे अध्यक्ष युवराज निंबाळकर, उपाध्यक्ष अरुण गवळे, प्रतिक झोरे, शाळेचे मुख्याध्यापक आर.डी.भारमल, पर्यवेक्षक अनिल गद्रे आदी उपस्थित होते. सिद्धांत सुतार यांनी विद्यार्थ्यांना मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण दिले. याशिवाय मंडळातर्फे किवळे येथील एंजल पब्लिक स्कूल येथे 100 विद्यार्थ्यांकरीता नवनाथ तरस अणि मच्छिंद्र तरस यांच्या सहकार्याने मूर्तीकार किरण जोशी यांनी हा उपक्रम केला.

सतत सराव करणे गरजेचे

गणपती ही विद्येची देवता असली, तरी असूरांचा संहार करणारी देखील गणेशाची रुपे आहेत. त्यामुळे दोन्ही रुपे मूर्तीमध्ये हुबेहुब साकारता येतील, यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करायला हवे. जेव्हा योग्य सराव केला जाईल, तेव्हाच हातातील जादू मूर्तीमध्ये प्रकट होईल. ज्ञान व कारागिरीला कधीही पूर्णविराम नसतो, त्यामुळे कोणत्याही गोष्टीत सतत सराव करणे गरजेचे आहे, असे मूर्तीशास्त्राचे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी सांगितले. जयंत गाडगीळ, आर. डी. भारमल यांनी मनोगत व्यक्त केले. प्रतिक झोरे यांनी सूत्रसंचालन केले.