भाषाक्षेत्रातही करिअरच्या उत्तम संधी : प्रा.डॉ.कसबे

0

राजगुरुनगर : भाषा ही सुसंवादासाठी व ज्ञानवृध्दीसाठी असून जर आपण काही भाषिक कौशल्य आत्मसात करून भाषेवर प्रभुत्व स्थापित केले तर भाषाक्षेत्रातही करिअरच्या उत्तम संधी असल्याचे प्रतिपादन चाकणच्या कला, वाणिज्य महाविद्यालयातील प्रा. डॉ. दिलीप कसबे यांनी केले. ते हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात तृतीय वर्ष मराठी विशेषस्तरावर अभ्यासनार्‍या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाप्रसंगी ’भाषाक्षेत्रातील संधी’ या विषयावर बोलत होते.

याप्रसंगी प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, कला शाखेचे उपप्राचार्य डॉ.संजय शिंदे, प्रा. दिलीप मुळूक, प्रा. बी. डी. अनुसे, प्रा. व्ही. व्ही. कांबळे आणि मराठीचे द्वितीय व तृतीय वर्षाचे विद्यार्थी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील व प्रा. दिलीप मुळूक, प्रा. व्ही. व्ही. कांबळे यांसह मोनिका तिटकारे, वृषाली शितोळे, देवयानी मघाडे, दिगंबर गायकवाड या विद्यार्थ्यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून मराठी विभागास कवी कुसुमाग्रज यांची ’स्वातंत्र्यदेवतेची विनवणी’ या कवितेची प्रतिमा भेट देण्यात आली. प्रास्ताविक उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख डॉ. संजय शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन विद्या खुरपे हिने केले तर आभार डॉ. बी. डी. अनुसे यांनी मानले.

संवाद कौशल्ये आत्मसात करावीत
डॉ. कसब म्हणाले, आपल्याकडे प्रतिभा, कल्पनाशक्ती, सर्जनशीलता हे गुण असतील तर शिक्षकीपेशासह निवेदक, पत्रकारिता, अनुवादक, जाहिरातलेखक, मुद्रिकशोधक, पटकथा- संवादलेखक, व्याख्याता, कथाकथन, काव्यगायन असे अनेक पर्याय करिअरसाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी मराठीचा अभ्यासक्रमही काळानुरूप असायला हवा. मराठी भाषा ही फक्त अभिमानासाठी न राहता हितसंबंधासाठी असायला हवी कारण नुसते भाषेच्या अभिमानावर पोट भरत नाही. चरितार्थ, व्यवसाय म्हणून भाषेत करिअर करायचे असेल तर संवाद कौशल्यांसारखी इतर भाषिक कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.