भाषेचा अडसर दूर करीत गॅलरीत अडकलेल्या मुलाची सुटका

0

वानवडी । भावना व्यक्त करण्यासाठी भाषेची गरज नसते. प्रेमाचा, आपुलकीचा एक स्पर्श खूप काही सांगून जातो. याचा प्रत्यय गुरुवारी अग्निशामक दलाच्या जवानांना आला. वानवडी येथील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील गॅलरीत अडकलेल्या मुलाची सुखरूप सुटका केली. या मुलाचे पालक अरबी असून त्यांना अरबी भाषेशिवाय अन्य कोणतीच भाषा येत नसल्यामुळे आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी त्यांनी अग्निशामक दलाच्या जवानांशी प्रेमाने हात मिळवून त्यांचे आभार व्यक्त केले.

केवळ हात मिळवून स्मित हास्य…
अग्निशमन दलाचे चालक दत्तात्रय वाघ तसेच जवान राहुल बांदल, संदीप जगताप यांना वेगळाच अनुभव आला. मुलाचे पालक अरबी असून त्यांना मराठी, हिंदी किंवा इंग्रजी कोणतीच भाषा संजय नव्हती. जवान बांदल यांनी त्यांना नाव विचारले असता त्यांनी प्रत्युत्तरार्थ फक्त अरबी अरबी असे म्हटले. हे कुटुंब अरबी असून त्यांना अरबी भाषेशिवाय कोणतीही भाषा येत नसावी असा अंदाज घेऊन त्यांच्याकडील कागदपत्रे पाहून मुलाचे नाव महमुद्दीन हकामे (वय 7) असे लक्षात आले. जवानांनी भाषेचा अडसर दूर करत व शेवटी कुठलीच भाषा सूर धरत नसल्याने मुलाच्या वडिलांनी व जवानांनी हात मिळवून स्मित हास्य करत प्रेमाच्या एकाच भाषेत आभार मानले. तसेच मुलाच्या वडिलांनी सर्वांचे एक चित्र टिपण्यास सांगून आनंद व्यक्त केला.

मुलगा तीन तास गॅलरीत
ही घटना गुरुवारी सायंकाळी सात वाजता वानवडी येथील स्टेप इन हॉटेलसमोर एका इमारतीत घडली. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर एक मुलगा गॅलरीत अडकल्याची माहिती अग्निशमन दलास मिळाली. दलाकडून कोंढवा (खुर्द) अग्निशमन केंद्रातील फायरगाडी रवाना करण्यात आली. मुलगा गेले तीन तास फ्लॅटच्या मुख्य दरवाजास कुलूप लागल्याने व पालक बाहेर गेल्याने गॅलरीत अडकला होता.

तिसर्‍या मजल्यावरून प्रवेश
इमारतीत पोहचताच अग्निशमन दलाचे जवान राहुल बांदल यांनी परिस्थिती पाहून तिसर्‍या मजल्यावरील एका फ्लॅटच्या गॅलरीतून मुलाला आवाज देत मुलगा सुखरूप असल्याची खात्री केली. जवान बांदल यांनी तिसर्‍या मजल्यावरील गॅलरीतून एका सज्जाचा आधार घेत धाडसाने चौथ्या मजल्यावरील गॅलरीत प्रवेश केला व अवघ्या पाच मिनिटात मुलाची सुखरूप सुटका केली. गॅलरीत प्रवेश करताच मुलाच्या चेहर्‍यावर नकळतच हास्य उमटले. जवान बांदल यांनी मुलाला घेऊन मुख्य दरवाजा उघडला. त्याचवेळी या मुलाचे पालक परतले व मुलाला जवान बांदल यांनी उचलून घेतलेले पाहून पालकांना गहिवरून आले. मुलगा सुखरुप असल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.