साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे ‘वाग्यज्ञे’ साहित्य व कला गौरव पुरस्कारांचे वितरण
पुणे : दाक्षिणात्य प्रदेशात मातृभाषेची अस्मिता बाळगत सिने-नाट्य सृष्टीतील अनेकांनी राजकीय भवितव्य आजमावले आणि त्यात ते यशस्वी देखील झाले पंरतु 12 कोटींच्या महाराष्ट्रात भाषेची अस्मिता बाळगत कला क्षेत्रातून नेतृत्व का पुढे येत नाही असा खडा सवाल ज्येष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी उपस्थित केला.
साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे आयोजित दोन दिवसीय साहित्यिक कलावंत संमेलनाच्या समारोपाच्या सत्रात ‘वाग्यज्ञे’ साहित्य व कला गौरव पुरस्काराचे वितरण डॉ. जोशी यांच्या हस्ते झाले. यंदाचा कला क्षेत्रासाठीचा पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांना, तर साहित्य क्षेत्रासाठीचा पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या गेल ऑमव्हेट यांना प्रदान करण्यात आला. स्व. रमेश गरवारे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणार्या या पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी अकरा हजार रुपये रोख असे होते. यावेळी संमेलनाचे प्रमुख संयोजक दिलीप बराटे, भारत पाटणकर, वि.दा. पिंगळे, संजय भामरे, राजेंद्र वाघ उपस्थित होते.
भाषेवर उपजीविका असलेले…
जोशी म्हणाले, धन-दांडग्यांच्या पैशावर साहित्य संमेलन आयोजित करायचे नाही. आणि साहित्य संमेलनासाठी संमेलन निधी उभारायचा ठरवल्यावर 1 कोटीच्याही वर हा निधी जाऊ शकला नाही, याची खंत वाटते. मराठी भाषेवरच उपजीविका असलेले प्राध्यापक, शिक्षक, लेखकमंडळी सढळ हाताने मदत करीत नाहीत. दाक्षिणात्य कलाकारांनी अभिनयाद्वारे ज्या प्रतिमा साकारत आले; त्याच प्रतिमांचे संवाहन त्यांनी केले. त्यामुळेच डीएमके, जय ललीता करुणानिधींसारखे नेतृत्व उभे राहिले आणि यशस्वी देखील झाले. राजकारण म्हणजे केवळ टाकाऊ असे नसून त्याद्वारे आपण अभिरुची संपन्न समाज घडवू शकतो. मराठी भाषिक कलाकारांचे असे आदर्श निर्माण झाले पाहिजेत.
उपदेशावर विश्वास नाही
‘तुम्हीच प्रश्न विचारा’ या सयाजी शिंदे यांच्या आग्रहानंतर रसिकांनी प्रश्नांची सरबत्ती केली. ‘दक्षिणेकडील राजकीय नेते आणि अभिनेते हा प्रभाव आता कुठेच का दिसत नाही,’ या प्रश्नावर शिंदे म्हणाले, निवडणुकीसाठी पूर्वी कार्यकर्त्यांना जेवण द्यावे लागायचे. आता गाड्या द्याव्या लागतात. निवडणुकीचा खर्च कोट्यवधी रुपये झाला आहे. उपदेशावर माझा विश्वास नाही. उपदेशाने समाज सुधारतो यावरही विश्वास नाही. कादंबरी, विचार, कविता किती वर्षे टिकतात? त्या तुलनेत झाडांनी अनेक विचारवंतांना पाहिलेले असते. माणसांसाठी खूप काही करूनही झाडं कुठे काय बोलतात? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.