चोरी करण्यासाठी भिंतीवर चढल्याचा पोलिसांना संशय
पिंपरी : कंपनीच्या भिंतीवरून खाली पडल्याने एका इसमाचा मृत्यू झाला. त्याच्याकडे चोरी करण्यासाठीचे साहित्य मिळून आले. त्यामुळे तो चोरी करण्यासाठी कंपनीच्या भिंतीवर चढला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. हा प्रकार आज (शनिवारी) सकाळी दहाच्या सुमारास पिंपरी येथे उघडकीस आला. मृत्यू झालेल्याचे वय अंदाचे 45 असून त्याची ओळख पटलेली नाही.
लोखंडी कटावणी सापडली
पिंपरीतील, एच.ए. कंपनीच्या बाजूला टेल्को कंपनी आहे. या कंपनीच्या परिसरात एक मृतदेह पडला असल्याची माहिती एच. ए. कंपनीच्या सुरक्षारक्षकांनी पिंपरी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. तो शवविच्छेदनासाठी वायसीएम रुग्णालयात नेण्यात आला. मृत्यू झालेल्या इसमाच्या खिशात लोखंडी कटावणी सापडली आहे. त्यामुळे तो कंपनीत चोरी करण्यासाठी आला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.