भिंत कोसळल्याने स्कुटर, सायकलचे नुकसान

0

जळगाव। शिवाजीनगरातील मकरापार्कच्या बाजुला बांधकाम सुरू आहे. शनिवारी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास जेसीबीद्वारे माती आणि जुने बांधकाम मटेरीअल बाजुला फेकण्याचे काम सुरू होते. त्यावेळी 10 फूट उंचीची जुनी संरक्षण भिंत कोसळली. सुदैवाने या ठिकाणी कोणाला दुखापत झाली नाही. मात्र भिंतीजवळ लावलेली स्कूटर आणि सायकल दाबली गेली. मकरापार्कच्या बाजुला पापड कारखाना होता. सध्या त्या ठिकाणी भंडारी कंन्स्ट्रक्शन कंपनीच्या अपार्टमेंटचे बांधकाम सुरू आहे. मात्र पापड कारखान्याच्या वेळी असलेल्या संरक्षण भिंती अजूनही तशाच आहेत. मात्र त्या भिंतीना 50 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाल्याने त्या जीर्ण झालेल्या आहेत. पापड कारखान्याचे शेड पाडल्यानंतर बांधकाम मटेरीअल भिंतीच्या बाजुला टाकले. शनिवारी सकाळी जेसीबीच्या सहायाने बांधकाम मटेरीअल बाजुला करण्याचे काम सुरू होते. जेसीबीचे वजन पडल्याने शनिवारी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास भिंत कोसळली.

सुदैवाने प्राणहानी टळली…
शिवाजीनगरातील भिंत कोसळण्याच्या काही क्षण अगोदर बाजुला राहणार्‍या प्रणव प्रदीप सुर्वे (वय 10) याने त्याची सायकल भिंतीजवळून काढली. तो काही फुटावर असतानाच भिंत कोसळली. एक सायकल मात्र भिंती खाली दाबली गेली. तसेच दहा मिनिट अगोदर त्याचे वडील प्रदीप प्रल्हाद सुर्वे यांनी त्यांची दुचाकी भिंतीजवळून काढून ते कामावर निघून गेले. बाजुला राहणार्‍या शेख रज्जाक शेख गुलाब यांची स्कूटर भिंतीजवळ लावलेली होती. भिंत कोसळल्याने स्कूटर दाबली गेली. दररोज या ठिकाणी गल्लीतील लहान मुले खेळत असतात. मात्र उन्हामुळे पालकांनी त्यांच्या मुलांना बाहेर सोडत नाही.