भिऊ नका! पाठीशी आहेत; ‘पोलिस काका’

0

हडपसर – शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थिनींना रोडरोमिओंकडून होणारा त्रास, विद्यार्थ्यांसोबत होणारे रॅगिंग हे प्रकार पोलिसांपर्यंत येत नसल्यामुळे गुन्हा करणारे मोकाट फिरतात. विद्यार्थ्यांमध्ये पोलिसांविषयी विश्‍वासाचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी पोलिसांकडून विद्यार्थ्यांसाठी ‘पोलिस काका’ योजना राबविण्यात येत आहे. कोणत्याही मुलाला काहीही त्रास झाल्यास, मुला-मुलींनो भिऊ नका, ‘पोलिस काकांना’ फोन करा ते तुमच्या मदतीला धावून येतील असा विश्‍वास मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पात्रूडकर यांनी व्यक्त केला.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या मुंढवा येथील लोणकर विद्यालयात, विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ‘पोलिस काका’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याप्रसंगी प्राचार्य सुनील लाडके, बाळासाहेब जगदाळे, दामिनी ब्रिगेडच्या कल्पना थिटे, ‘पोलिस काका’ पांडुरंग पवार, ब्रह्मदेव मेटे, शंकर जांभूळकर, मोहन भोसले, शरद बोराटे, मोहन शिंदे, शिवाजी गायकवाड आदी उपस्थित होते.

पात्रुडकर म्हणाले, पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पुण्यात आयटीतील महिलांच्या सुरक्षिततेसाठी राबविण्यात आलेला ‘बडीकॉप’ उपक्रम यशस्वी झाल्यानंतर आता शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ‘पोलिस काका’ हा नवीन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. शाळा-महाविद्यालय परिसरात पोलीस गस्त घालणार आहेत. त्यामुळे रोडरोमिओंवर कडक कारवाई केली जाईल. तसेच दर दोन दिवसांनी दामिनी ब्रिगेडची महिला पोलीस शाळेत येऊन मुलींशी संवाद साधत आहेत. या पथकाने वेळोवेळी रोडरोमिओंवर कारवाई केली आहे. शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांत रॅगिंग व रोडरोमिओंचा त्रास भविष्यात घडू नये, यासाठी ‘दामिनी ब्रिगेड’ व ‘पोलिस काका’ सदैव तयार राहणार आहेत.