भिगवण । भिगवण पोलिस ठाणे हद्दीतील गावांच्या सुरक्षिततेसाठी गावागावात सीसीटीव्ही बसविण्याचे आवाहन भिगवण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नीलकंठ राठोड करीत आहेत. याला काही गावातून चांगला प्रतिसाद मिळत असला तरी 15 गावांपैकी 10 गावांनी पोलिसांच्या या आवाहनाला केराची टोपली दाखवल्याचे चित्र दिसून येत आहे.
गावोगावी बैठका
गुन्ह्याचे प्रमाण कमी व्हावे आणि काही गुन्हा होत असेल तर त्याचे चित्रीकरण व्हावे, यासाठी ग्रामीण पोलीसचे सुवेझ हक यांनी गावातील चौकांमध्ये तसेच वर्दळीच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना केल्या होत्या. या सूचनेचे पालन करीत भिगवण पोलिस अधिकारी यांनी प्रत्येक गावात जाऊन नागरिकांची बैठक घेऊन सीसीटीव्ही बसविण्याबाबत आवाहन केले.
गुन्ह्यांच्या तपासात अडथळा
भिगवण पोलीस ठाण्यात प्रमुख गावातील सरपंच, उपसरपंच तंटामुक्त अध्यक्ष, तसेच मंडळाचे कार्यकर्ते यांनी संयुक्त बैठक घेत आवाहन केले. परंतु काही गावांचा अपवाद वगळता गावकारभार्यांनी याकडे गांभीर्याने पाहिलेले दिसून येत नाही. पोलिसांनी वारंवार आवाहन करूनही सीसीटीव्ही बसविले गेले नाहीत. त्यामुळे काही गुन्हा घडल्यास पोलिसांना तपास करण्यास अडचणी येतात. भिगवणशेजारी असणार्या तक्रारवाडी, मदनवाडी, कुंभारगाव, पिंपळे, पोंधवडी, डाळज 1,2,3, भिगवण स्टेशन, डिकसळ या गावांनी आजपर्यंत सीसीटीव्ही बसविले नसल्याचे समजते. गुन्हा घडल्यावर गडबडीने पोलिस ठाण्याकडे धाव घेणार्या गावकारभार्यांनी पोलिसांच्या महत्त्वाच्या योजनेला पाठबळ देण्याची गरज आहे.
निधीची कमतरता
कामगाराला पगार देण्यासाठीच निधी नाही, तर सीसीटीव्हीचा खर्च कोण करणार, असा सावाल बहुतेक ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक यांनी उपस्थित केला. पोलिसांची योजना गावातील नागरिकांसाठी महत्त्वाची असली तरी वर्गणीसाठी कोणीही पुढे येत नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. तसेच रोटरीसारख्या सामाजिक संघटना आणि शासनाने यात कही मदत केल्यास ही योजना राबविली जाऊ शकते, असे मत व्यक्त केले.