भिगवणमध्ये विषाणूजन्य साथीच्या रोगांचा फैलाव; आरोग्य यंत्रणा मात्र सुस्त

0

भिगवण । भिगवण शहरात विषाणूजन्य साथीच्या रोगाने थैमान घातले आहे. त्यातच डेंग्यूने एक जणाचा बळी गेला आहे. असे असताना आरोग्य यंत्रणा मात्र सुस्त असल्याचे दिसून येते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य रामभरोसे झाले आहे.

शिवाजी साधू चौंडकर (वय 65 रा. विवेकानंद नगर) असे डेंग्यूमुळे मृत्यूमुखी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. पंधरा दिवसांपूर्वी चौंडकर यांच्या शरीरातील पेशी, प्लेटलेट्स कमी झाल्यामुळे त्यांनी भिगवण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन प्राथमिक तपासणी केली. तेथून त्यांनी दोन ठिकाणी खासगी रुग्णालयात उपचार केले. मात्र, आजार जादा बळावल्याने त्यांना पुण्यातील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. याबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्रात विचारणा केली असता याठिकाणी कसल्याही प्रकारचे डेंग्यूचे रुग्णच नसल्याचे सांगत हात झटकले आहेत.

स्वच्छतेचे तीनतेरा
ताप येणे, तीव्र डोकेदुखी, सांधेदुखी, प्लेटलेट्स कमी होणे, मळमळणे आदी लक्षणे असल्याचे रुग्ण आढळत आहेत. अनेक जणांना डेंग्यू, गोचीड ताप, त्याचबरोबर चिकुनगुनिया सदृश्य रोगांची लागण झाली आहे. भिगवणसह लगतच्या मदनवाडी, तक्रारवाडी गावात नागरी संख्या जास्त असल्याने स्वच्छतेचे तीनतेरा झाले आहे, त्यामुळे सर्वांनी स्वच्छतेविषयी जागरूक राहून कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन ग्रामपंचायतींच्या वतीने करण्यात आले आहे. स्वच्छता जागृतीविषयी आरोग्य पथक कार्यरत आहेत. कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अरविंद कोकाटे यांनी केले आहे.

रुग्णालये हाऊसफुल्ल
दीड वर्षांपूर्वी एका डॉक्टरच्या मुलाचा डेंग्यूने मृत्यू झाला होता. त्यामुळे स्वच्छतेविषयी नागरिक कमालीचे जागरूक झाले आहेत. मात्र, पुन्हा एकदा डेंग्यूने डोके वर काढल्याने नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. वातावरणातील बदलामुळे विषाणूजन्य साथीच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. भर दिवाळीतच सर्व रुग्णालये रुग्णांनी भरून गेली होती. अनेक रुग्णांना दवाखान्यात दाखल करण्यासाठी जागा नसल्याने इतरत्र उपचार घ्यावे लागले.

धुरळणीचा दावा फोल
भिगवण परिसरातील मदनवाडी, पिंपळे, सिद्धेश्‍वर निंबोडी, बिल्ट कॉलनी, शेटफळगढे आदी गावांत जवळपास शेकडो रुग्णांना डेंग्यूची लागण झाली असून, भिगवण शहरातील वेगवेगळ्या दवाखान्यात सध्या ते उपचार घेत आहेत. मात्र, आरोग्य यंत्रणेने कसलीही उपाययोजना केलेली नाही, तर भिगवण ग्रामपंचायतीने फॉगिंग मशिनद्वारे धुरळणी केल्याचा दावा फोल ठरत आहे. भिगवण बस स्थानकाशेजारील म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हाकेच्या अंतरावरील विवेकानंद नगर येथील ज्येष्ठ नागरिकाचा डेंग्यूच्या आजाराने मृत्यू झाला असला तरी याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्राकडे कसलीही माहिती उपलब्ध नाही.