पुणे । नमामि चंद्रभागा जलसाक्षरता यात्रेचे शनिवारी भिगवण येथे आगमन झाले होते. यावेळी उजनी जलाशयाची पाहणी करण्यात आली. पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सीजनचे प्रमाण तपासण्यात आले. यावेळी मच्छीमारांनी व्यथा मांडल्या. येथे मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले आहे. पाण्यात सतत पाय राहिले तर त्वचारोग होतात. माशांच्या प्रजाती कमी झाल्या, असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अनील पाटील, अॅड. जगताप, नरेंद्र चुघ आदी मान्यवर उपस्थित होते.
रांझणी येथील ओंकारनाथ मंदिरात जल कलश पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी जलप्रतिज्ञा घेतली. भीमा नदी कार्य दलाची यावेळी स्थापना करण्यात आली. तसेच जल है तो कल है हे पथनाट्य सादर करण्यात आले. पर्यावरण दृष्ट्या भिगवण तलावाचे महत्व अनन्य साधारण आहे. जगभरातून दुर्मिळ पक्षी आणि पर्यावरण अभ्यासक येथे येतात. मात्र, उजनी धरणाला प्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे. पुढील पिढीचे भविष्य अवघड होणार आहे. अशा वेळी युवकांनी जलरक्षणासाठी पुढे आले पाहिजे, असे आवाहन संघटक सुनील जोशी यांनी केले.