भिडेंच्या अटकेसाठी एल्गार

0

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे यांना अटक करावी, या मागणीसाठी मुंबईत एल्गार मोर्चा काढण्यात आला होता. यासाठी राज्यभरातून हजारो लोक मुंबईत आले होते. भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत हा मोर्चा काढण्यात आला. जिजामाता उद्यान ते आझाद मैदान या मार्गावरुन जाणाऱ्या मोर्चाला रविवारी पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यामुळे असंख्य लोक थेट आझाद मैदानावर जमले. पण, काही लोक जिजामाता उद्यानातही जमले होते. आझाद मैदानावर बहुतांश आंबेडकरी विचारांना मानणाऱ्या संघटनांनी आपला एल्गार मांडला होता. विद्रोही गीतांच्या माध्यमातून हलगीच्या साथीने सरकारी धोरणांचा निषेध केला जात होता. अवघ्या आझाद मैदानावर निळाई उतरल्याचा भास यावेळी होत होता.

भीमा कोरेगाव प्रकरणी खरोखर सरकारच्या भूमिकेवर आता मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिल्याचे दिसून येतेय. या प्रकरणी मिलिंद एकबोटे आणि भिडे या दोघांची नावे एफआयआर मध्ये आहेत. त्यातील मिलिंद एकबोटे याला अटक करण्यास अडीच महिने लागतात. तर गुर्जी असलेले संभाजी भिडे सगळीकडे फिरत असून पत्रकार परिषदा घेतात. मात्र राज्य सरकारला सापडत नाहीत.भिडेंच्या कार्यक्रमांना सरकार परवानगी देते. मात्र याच भिडेला अटक करायची वेळ आली की पोलिसांना तो सापडत नाही.

भिडे यांना अटक करण्यासाठी अॅड. प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एल्गार मोर्चा काढला. तर या मोर्चालाच परवानगी नाकारत सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली. या मोर्चात आलेल्या प्रत्येक चेहऱ्यावर भिडेला अटक होत नसल्याचे चीड होती, संताप होता. मात्र तरीही बाबासाहेबांच्या संविधानावर विश्वास असणारे हे चेहरे लोकशाही मार्गाने आपली मागणी सरकारकडे मागत आहेत. एकबोटे, भिडे हे खुलेआम पणे पत्रकार परिषदा घेतात. तसेच त्या पत्रकार परिषदांमधून ते सरकारला धमकावतात. त्यांना भेटायला जिल्हाधिकारी, पोलिस अधिकारी जातात, असा आरोप करत विरोधकांनी काही काळ सभागृहात विषय लावून धरण्याचा प्रयत्न केला मात्र त्यामध्ये विशेष काही दम दिसून येत नव्हता. जितेंद्र आव्हाड वगळता कुणाच्याही मांडणीत दम वाटत नव्हता. असो, लोकशाही आणि संवैधानिक विचारांवर चालणाऱ्या या देशात दंगली भडकविणाऱ्या लोकांना निर्दोष फिरू दिले जाणार नाहीच. पारदर्शक असलेल्या या सरकारकडून मनोहर भिडेंना अटक होईल अशी आशा बाळगूया.

-निलेश झालटे