विरोधी पक्षनेत्यांसह अजित पवार यांची भिडेंना अटक करण्याची मागणी
चौकशी करून कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
निलेश झालटे, नागपूर- संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊलीपेक्षा मनुचे विचार श्रेष्ठ आहेत असे म्हणणाऱ्या मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांना अटक करण्याची मागणी विधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील, अजित पवार यांनी केली. यावेळी त्यांनी संताप व्यक्त करत सरकारच्या बोटचेपी धोरणमुळे अशा प्रवृत्ती वाढल्या असल्याचा आरोप केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी चौकशी करून संविधांविरोधी वक्तव्य असेल तर कारवाई करू असे सांगितले.
भिडेंच्या मागील मास्टरमाईंड कोण? : अजित पवार
हे देखील वाचा
संभाजी भिडे येतो आणि माऊली-तुकोबांपेक्षा मनू श्रेष्ठ होता असे बेताल वक्तव्य करतो हे पुरोगामी महाराष्ट्रासाठी चुकीचे असून महाराष्ट्रातील जनता कदापी खपवून घेणार नाही. यामागचा मास्टरमाईंड कोण आहे हे स्पष्ट करावे आणि तरुणांचे विचार भ्रष्ट करण्याचे काम करणाऱ्या संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करा अशी मागणी विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी औचित्याच्या मुद्दयाद्वारे सभागृहात केली. माऊली आणि तुकोबाचे विचार सर्व जगाला माहिती आहे. आपण त्यांच्या विचारांसमोर नतमस्तक होतो. पण कोण तरी संभाजी भिडे येतो आणि माऊली-तुकोबांपेक्षा मनू श्रेष्ठ होता असे बेताल वक्तव्य करतो हे योग्य नाही. ५७ टक्के लोकांना शुद्र मानणारा मनू श्रेष्ठ कसा ? हे आपल्या राज्यात चालणार नाही. यावर राज्य सरकारची भूमिका स्पष्ट व्हायला हवी. मागच्या वर्षी हे पालखीमध्ये तलवारी घेवून आले होते. यांचा पाठीराखा कोण आहे असा सवालही पवारांनी केला. समाजातील दोन-तीन टक्केच लोक चांगली आहेत असे विचार मनुने सांगितले.तो विचार योग्य नाही हे सांगण्याचे काम महात्मा फुलेंनी केलं. घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपली भूमिका मांडली आणि ती मनुस्मृती फाडून जाळून टाकली.त्या मनुला हे गोंजारत आहेत हे कसले विचार आणले जात आहेत असा सवालही त्यांनी केला. त्यामुळे त्यांना अटक केली पाहिजे आणि जागा दाखवून द्यावी अन्यथा महाराष्ट्रातील जनता हे सहन करणार नाही, असे पवार म्हणाले.
मनूस्मृतीचे श्रेष्ठत्व सरकारला मान्य असेल तर जाहीर करा: विखे पाटील
संभाजी भिडे सातत्याने कायद्याच्या चिंधड्या उडवत आहेत. गेल्या वर्षीच्या वारीत त्यांनी नंग्या तलवारी नाचवल्या होत्या. परंतु, त्यांच्याविरूद्ध कारवाई झाली नाही. भीमा-कोरेगावच्या हिंसाचारात त्यांची भूमिका संशयास्पद होती. परंतु, त्यांच्याविरूद्ध कारवाई झाली नाही. आंबा खाल्ल्याने पुत्रप्राप्ती होते, असे सांगून त्यांनी जाहीरपणे अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे आणि गर्भनिदान कायद्याचे उल्लंघन केले. परंतु, त्यांच्याविरूद्ध कारवाई होताना दिसत नाही. सरकारच्या या बोटचेप्या भूमिकेमुळे आता भिडेंची हिंमत एवढी वाढली आहे की, ज्ञानोबा-तुकोबांपेक्षा मनू एक पाऊल पुढे होता, असे त्यांनी जाहीर करून टाकले. मनुस्मृतीचा उदो-उदो करणाऱ्या संभाजी भिडेंची सरकार सातत्याने पाठराखण करते; याचा अर्थ सरकार त्यांच्याशी सहमत आहे. भिडेंवर आणि त्यांच्या भूमिकेवर सरकारला एवढेच प्रेम असेल, मनूस्मृतीचे श्रेष्ठत्व सरकारला मान्य असेल, तर मग अधिवेशन सुरू आहे, कायदा करा आणि मनूस्मृती भारताच्या संविधानापेक्षा एक पाऊल पुढे असल्याचे जाहीर करून टाका, अशी खोचक टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
संविधान विरोधी असेल तर कारवाई करू: मुख्यमंत्री
राज्य सरकारची भूमिका ज्ञानोबा माऊली, तुकोबांचे विचार आणि संविधानाने बांधलेली आहे. मनुचे विचार कुठल्याही स्तरावर आम्हाला मान्य नाहीत. गेल्या सरकारच्या काळात देखील शिवप्रतिष्ठान शस्त्रे घेऊन येत होती, ही पद्धत जुनी आहे. मात्र गेल्या वर्षी आम्ही शस्त्रास्त्र आणण्यास बंदी घातली. परंपरा आहे म्हणून डमी शस्त्र वापरा असे सांगितले. आम्ही कुठल्याही घटनेविरोधी प्रवृत्तीला थारा देणार नाहीत. भिडे जे बोलले आहेत ते तपासले जाईल. आणि त्यात संविधान विरोधी काही असेल तर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.