नवी दिल्ली : पाचशे आणि दोन हजारच्या नोटांचे डिझाईन आणि आकार वेगवेगळ्या असल्याचे काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी नोटा संसदेत दाखवत निदर्शनास आणून दिले. या शतकातील सरकारचा हा सर्वांत मोठा घोटाळा असल्याचा आरोपही विरोधकांनी केला. या प्रकरणी काँग्रेसने तृणमुल आणि जदयूच्या मदतीने राज्यसभेत गदारोळ केला. यामुळे पहिल्या तासाभरात चार वेळा राज्यसभा तहकूब करावी लागली. नोटांवरुन विरोधकांनी केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले.
एक नोट सत्ताधार्यांसाठी
कपिल सिब्बल म्हणाले की, सरकारने नोटाबंदी का केली हे आम्हाला आहे, सरकारने छापलेल्या नव्या नोटांपैकी एक नोट ही सत्ताधार्यांसाठी तर दुसरी नोट ही इतरांसाठी आहे. दरम्यान, शतकातला हा सर्वांत मोठा घोटाळा असल्याचा आरोप यावेळी काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी केला. पॉईंट ऑफ ऑर्डरच्या माध्यमातून या प्रश्न मांडता येणार नाही. तुम्हाला वेगळ्याप्रकारे हा मुद्दा मांडावा लागेल. त्यासाठी वेगळी सूचना मांडावी लागेल. असे यावेळी राज्यसभेचे उपाध्यक्ष पी. जे. कुरियन विरोधकांना सांगितले.
विरोधकांचा शुल्लक गोष्टींवर बाऊ : जेटली
सभागृह नेत्यांच्या समोर वेलमध्ये येऊन काँग्रेस नेत्यांनी घोषणाबाजी केली. जदयूचे नेते शरद यादव यांनीही काँग्रेसला साथ देत पाचशे रुपयांच्या मोठ्या आकारातील झेरॉक्स प्रती दाखवत गोंधळ घातला. मी नोटांच्या प्रतींवर सह्या करून द्यायला तयार आहे, असे त्यांनी कोषागार अधिकार्यांना सांगितले. जगातील कुठल्याही देशाकडे एकाच मुल्याच्या वेगवेगळ्या आकाराच्या नोटा नाहीत, असेही यादव म्हणाले. तृणमूलचे देरेक ओब्रेन यांनी देखील सभागृहात 500 रुपयांच्या नव्या नोटा दाखवत त्यांच्या आकारात फरक असल्याचे सांगितले. सुरुवातीला त्यांनी या नोटा अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे तपासणीसाठी सुपूर्द केल्या. विरोधकांच्या या आरोपाला उत्तर देताना अर्थमंत्री अरूण जेटली म्हणाले, विरोधक विनाकारण शुल्लक गोष्टींचा बाऊ करीत आहेत. सभागृहात एखादा कागद दाखवून प्रश्न उपस्थित करण्याची नियमांमध्ये तरतुद नाही. याद्वारे सभागृहाने ठरवून दिलेल्या शून्य प्रहराचा हा गैरवापर आहे.