भिमा नदीपात्राच्या दुतर्फा 4 हजार हेक्टरवर तयार करणार फळबागा

0

पुणे । राज्य शासनाच्या नमामि चंद्रभागा अभियानाला गती देण्यासाठी लोकसहभाग वाढविण्यावर भर द्यावा. 50 कोटी वृक्ष लागवड या मोहिमेची सांगड या अभियानाबरोबर घालण्यात येणार असून याअंतर्गत भिमा नदी पात्राच्या दुतर्फा 500 मीटरपर्यंत फळबागांची लागवड करून 4 हजार हेक्टर क्षेत्रावर हरित पट्टा विकसित करण्यात येणार असल्याची माहिती नमामि चंद्रभागा प्राधिकरणाचे सचिव तथा विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी शनिवारी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नमामि चंद्रभागा प्राधिकरण प्रकल्प संनियंत्रण समितीची सभा दळवी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव, मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, एन. एन. राव, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हार्डीकर याप्रसंगी उपस्थीत होते.

चंद्रभागा नदी संवर्धन अभियान
चंद्रभागा नदीच्या काठावर वसलेल्या पंढरपूर तीर्थक्षेत्राचे महत्त्व लक्षात घेऊन एकत्रीरित्या चंद्रभागा नदी संवर्धन अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत चंद्रभागा नदी सन 2022 पर्यंत प्रदुषणमुक्त करून तिचे संवर्धन करण्यासाठी हे अभियान हाती घेण्यात आले आहे. भिमानदीचे उगमस्थान असलेल्या भीमाशंकरपासून ते राज्याच्या सीमेपर्यंत राबविण्यात येणार आहे. या नदीसह तिच्या उपनद्या व तिला मिळणार्‍या मोठ्या नाल्यांवरील प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना आखण्यात येणार आहेत.

16.80 कोटींचा निधी
अभियाना दरम्यान नदीकाठच्या शेतकर्‍यांमध्ये प्रबोधन करण्यात येणार आहे. वनक्षेत्र वाढविण्याबरोबरच शेतकर्‍यांची आर्थिक उन्नती करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच प्रक्रीया उद्योगांनाही चालना मिळणार आहे. या अभियानात नगरविकास, वित्त, नियोजन, पर्यावरण, ग्रामविकास, पाणी पुरवठा व स्वच्छता, जलसंपदा विभाग तसेच संबंधित क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा सहभाग असणार आहे. अभियानाच्या पहिल्या टप्प्यासाठी पर्यावरण विभागाकडून 16.80 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून कामाला सुरुवात झाली आहे.

नदी घाटाचे सौंदर्यीकरण
चंद्रभागा नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी कायम रहावी यासाठी बंधारे बांधणे, नदीचा प्रवाह अबाधित ठेवणे, पंढरपूर यात्रा कालावधीत सार्वजनिक स्नानगृहे व शौचालये उपलब्ध करणे, नागरी वस्त्यांमधून नदीत सोडणार्‍या सांडपाण्यावर प्रक्रीयेसाठी यंत्रणा उभारणे, घनकचर्‍याची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावणे, नदी घाटांचे सौंदर्य व वनीकरण करणे, यात्रा मार्गावर हरित पट्टे, बाग-बगिचे व वनीकरण यांचा यामध्ये समावेश आहे.

जनजागृतीसाठी जलयात्रा
अभियान यशस्वी करण्यासाठी जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली भीमाशंकर ते भिमानदीच्या महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत 7 ते 14 ऑगस्ट 2017 या कालावधीत जलयात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून जनजागृती बरोबरच नवी पिढी या अभियानासाठी जोडण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. तरी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना दळवी यांनी यावेळी दिल्या.