यवत । शेतकरी सभासदांच्या मालकीचा असलेला भीमा पाटस कारखाना सुरू होत असून गळीत हंगाम यशस्वीरित्या पार पाडेल. याचबरोबर जिल्ह्यात ऊसाचा दर देखील सर्वप्रथम जाहीर करू अथवा पहिला दर जाहीर करेल त्या कारखान्याच्या बरोबरीने पहिला हप्ता देऊ. यासाठी ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांनी संस्थेच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहन दौंड तालुक्याचे आमदार व कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांनी केले आहे.
भीमा पाटस कारखान्याच्या 38 व्या गळीत हंगामाचा बॉयलर प्रदीपन कार्यक्रम शुक्रवारी कारखान्याचे संचालक तुकाराम ताकवणे व त्यांच्या पत्नी सविता ताकवणे यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक विकास शेलार यांनी केले. कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर, प्रेमसुख कटारिया, सुरेश शेळके, माऊली ताकवणे, नीलकंठ शितोळे, आबासाहेब निधे, दादासाहेब केसकर आदींसह कर्मचारी उपस्थित होते.भीमा पाटस कारखान्याला शासनाने 35 कोटी 90 लाख रुपयांचे कर्ज दिले आहे. कारखाना अडचणीत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व मंत्र्यांनी राज्य शासनाकडून कारखान्याला मोठी मदत केल्याने कारखाना वेळेत सुरू होत आहे. याबाबद्दल सर्व मदत करणार्या मंत्र्यांचे आभार आमदार कुल यांनी मानले.
विकासकामे मार्गी लागणार!
भीमा पाटस कारखान्याला शासनाची मदत मिळणार नाही आणि तो सुरू होणार नाही, असा प्रचार विरोधक मंडळी करत होती. आता पैसे देखील मिळाले आणि कारखाना देखील सुरू झाला. त्याचप्रमाणे तालुक्यात मंजुर झालेली 900 कोटी रुपयांची कामे देखील होतील. लवकरच तालुक्यातील रस्ते पक्के आणि चकाचक होतील. विकास कामे वर्षभरात पूर्ण करण्याचा निर्धार कुल यांनी यावेळी व्यक्त केला. अन्यथा पुढील विधानसभेला उमेदवारी अर्ज देखील भरणार नसल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना जाहीर केले.
गुर्हाळांच्या अंतिम दराएवढा पहिला हप्ता
दौंड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गुळाची गुर्हाळे सुरू आहेत. या गुर्हाळामध्ये दिला जाणारा अंतिम दरा एवढा पहिला हप्ता देण्याचे संकेत यावेळी आमदार कुल यांनी दिले. यामुळे भीमा पाटस कारखान्याला ऊस देणार्या शेतकर्यांचा अंतिम दर गुर्हाळांच्या दरापेक्षा जास्तीचा असणार आहे. यामुळे करखान्याला ऊस देणार्या शेतकर्यांचा आर्थिक फायदा होणार असल्याची चर्चा सुरू आहे.