भिवंडी । भिवंडी महापालिका प्रभाग समिती क्रमांक 1 ते 5 कार्यक्षेत्रात तब्बल 998 धोकादायक इमारती जाहीर झाल्या आहेत. त्यापैकी जुन्या इमारती, चाळी, कारखाने, दुकाने अशा एकूण 324 अतिधोकादायक इमारती आहेत. यावर तातडीने तोडक कारवाई करण्याच्या पार्श्वभूमीवर 55 इमारतींमधील राहणार्या रहिवाशांचे पाणी व विजेच्या जोडण्या प्रशासनाच्या वतीने तोडण्यात आल्याची माहिती अनधिकृत बांधकाम विभागाचे उपायुक्त अनिल डोंगरे यांनी दिली. भिवंडी शहरातील काही भागातील इमारती या मालकी हक्कावरून वाद असून परस्परांवर दाखल करण्यात आलेले दावे विविध न्यायालयात प्रलंबित असल्याने अशा इमारतींवर कारवाई करण्याचे काम थांबविण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यामुळे या इमारतींना अभय मिळाले आहे.
अनेक राजकीय नेते, विकासकांचा कारवाईत अडथळा
जुन्या इमारती पडून मोठ्या प्रमाणावर जीवीत व वित्तहानी होते हे लक्षात घेऊन भिवंडी महापालिका प्रशासनाने अतिधोकादायक इमारतींवर तोडक कारवाई करण्याचे ठरविले आहे. तश्या प्रकारचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी प्रशासनाला दिले आहे. त्यानुसार प्रशासनाने कारवाईचे काम हाती घेतले आहे. मात्र काही आजी माजी नगरसेवक, राजकीय नेते तसेच विकासक यांच्याकडून कारवाईत अडथळे निर्माण केले जात असल्याने तातडीने तोडक कारवाई करण्यास बाधा निर्माण होत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. एवढेच नव्हे तर काही भागातील इमारती या मालकी हक्कावरून वाद असून परस्परांवर दाखल करण्यात आलेले दावे विविध न्यायालयात प्रलंबित असल्याने अशा इमारतींवर कारवाई करण्याचे काम थांबविण्यात आल्याची माहिती मिळाली.
भिवंडी पालिकेच्या सूचनांचे नागरिकांकडून उल्लघंन
महापालिका प्रभाग समिती क्रमांक 5 मध्ये शहरातील मध्यवर्ती भागाचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजेच 324 धोकादायक तर 211 अतिधोकादायक इमारती आहेत. लोकवस्तीने गजबजलेल्या इमारती पडून प्राणहानी टाळण्यासाठी प्रशासन गांभीर्याने कारवाईसाठी पुढे येत आहे. अतिधोकादायक इमारतींत राहणार्या रहिवाशांनी आपापली घरे रिकामी करून सुरक्षितस्थळी जाण्याच्या सूचना देऊनही रहिवाशी प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करीत नाहीत. अतिधोकादायक उर्वरीत इमारतींत राहणार्या रहिवाशांचे वीज व पाणी कनेक्शन तोडण्याचे काम जलदगतीने केले जाईल असेही उपायुक्तांनी सांगितले.