भिवंडीतील नागरी समस्या प्राधान्याने सोडवणार

0

भिवंडी : भिवंडी महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत डबघाईस आलेली असताना आणि नागरी समस्यांचा पुरता बोजवारा उडालेला आहे. नागरी समस्यांप्रमाणे रस्त्यावर पडलेले खड्डे, कार्यक्षेत्रातील साफसफाईचा प्रश्न तसेच पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आदी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आपण प्रथम प्राधान्याने प्रयत्न करू असा विश्वास महापौर जावेद दळवी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.

रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी महापालिका अधिकार्यांशी चर्चा करून तसेच सहकारी नगरसेवक आणि आयुक्तांच्या संयुक्त प्रयत्नाने प्रभाग समिती क्रमांक 1 ते 5 कार्यक्षेत्रातील मुख्य रस्ते डांबरीकरणाने दुरूस्तीकरणे कामी प्रभाग निहाय 25 लाख रूपये खर्च केले जाणार आहे. त्याच प्रमाणे अन्य रस्त्यांवरील खड्डे पेव्हरब्लॉकच्या साह्याने भरण्यासाठी देखील प्रभाग समिती निहाय 25 लाख रूपये खर्च करण्यात येणार आहे. गोकुळआष्टमी, गणेशोत्सव, जैन बांधवांचा पर्युषण पर्व तर मुस्लिम बांधवांच्या बकरी ईद सणांपुर्वी शहरातील रस्ते सुस्थितीत करण्याचा प्रयत्न करणार आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातुन शहरांतील 52 रस्त्यांचे क्राँक्रिटकरण करण्याच्या कामाकरीता 107 कोटींचा निधी मंजूर केला असून प्रत्यक्षात त्या कामाला दिवाळीत सुरूवात केली जाणार आहे. साईबाबा मंदिर ते स्व. राजीव गांधी चौक कल्याण नाक्यापर्यंत उड्डान पुलाचे काम होत असून उड्डानपुलाखाली रस्त्यांचे काँक्रीटीकरणाचे काम हे उड्डान पुलाच्या कामात समाविष्ट असल्याने त्या रस्त्यांचे देखील काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. तसेच अंजूरफाटा ते वंजारपट्टी नाका या मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम केंद्र शासनाच्या राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाच्या वतीने 42 कोटी रूपयांतून करण्यात येणार आहे. यावेळी सभागृह नेते प्रशांत लाड, गटनेता हलीम अन्सारी, नगरसेवक तफज्जुल अन्सारी उपस्थित होते.