भिवंडीत श्रमजीवी आंदोलन छेडणार

0

भिवंडी । गोरगरीब आदिवासी, कातकरी लोकांच्या कल्याणाच्या वल्गणा करणारे राज्य शासन विशेष म्हणजे या समाजात मोडणारे राज्याचे आदिवासी कल्याण मंत्री असूनही भिवंडी तालुक्यातील वांद्रे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात असलेल्या नदीकाठी 17 कुटूंबे रहात आहेत. आदिवासी, कातकरी पाड्याची भीषण दैन्यावस्था पाहण्यासाठी श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते सुनील लोणे, केशव पारधी, विजय राऊत आदींनी भेटी दिल्या. त्यावेळी आदिवासी कुटूंबियांनी शासन आणि ग्रामपंचायतीकडून सापत्न वागणूक कशी दिली जाते याचा सविस्तर पाढा वाचला. येत्या दहा दिवसांत सर्व सोयीसुविधा पुरविणे बाबत कार्यवाही केली नाही तर राज्य शासनाचे त्याचप्रमाणे आदिवासी कल्याण मंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी उग्र आंदोलन छेडले जाईल.

समस्या पाचवीलाच पुजलेल्या
वांद्रे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात 17 कुटूंबे राहत आहेत. तेथील बोअरवेल बंद पडल्याने आजूबाजूकडील साठलेले गढूळ पाणी प्यावे लागते. त्यामुळे कुटूंबियांच्या सार्वजनिक आरोग्यावर विपरीत परिणाम झालेला आहे. वर्षानुवर्षे रस्ता आणि दिवाबत्तीची सोय नसल्यामुळे चिखल तुडविणे आणि घरी जाणे हे जणू काही या कुटूंबियांच्या पाचवीला पुजले आहे असेच दिसत आहे.