भिवंडीत हुंड्यासाठी लग्न मोडणाऱ्या वाग्दत्त पतीसह कुटुंबीयांच्याविरोधात गुन्हा दाखल

0

भिवंडी (रतनकुमार तेजे ): मनांत जसं होतं तसाचं पती मिळाला.साखरपुडा झाल्याने तरुणी खुपच आनंदात होती.लग्नाची जय्यत तयारी सुरु असतानाच एके दिवशी भावी पतीने तरुणीला मुंबईला भेटण्याच्या बहाण्याने बोलावून लग्नासाठी १० तोळ्यांची गंठण व पाच लाख रुपये दिले तरचं मी लग्नाला तयार होईन असे बोलून लग्न करण्यास नकार दिला.भावी पतीच्या बोलण्याने तरुणीच्या डोक्यावर आभाळ कोसळावं अशी तिची स्थिती झाली.

लग्नानंतर भावी आयुष्याची स्वप्ने रंगवणाऱ्या तरुणीसमोर अंधारच पसरला. तिने घरी येवून घडलेली हकीकत कुटुंबीयांकडे कथन केली.नातेवाईकांनी यातून मार्ग काढण्यासाठी वाग्दत्त पतीच्या घरी जावून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.मात्र बुरसटलेल्या विचारसरणीच्या लेनाड ( शहापूर ) येथील वेखंडे परिवाराने हुंड्याचा आग्रह सोडला नाही.त्यामुळे अखेर हतबल झालेल्या कळंबोली (पडघा ) येथील तरुणीने पोलीस ठाणे गाठून भावी पतीसह त्याच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पडघ्यालगतच्या कळंबोली गावातील प्लंबर अशोक ठाकरे यांची मुलगी ललिता ( २०) हिचा विवाह बँकेत नोकरी करणारा लेनाड येथील युवक किशोर वेखंडे याच्याशी जमवण्यात आला होता.दोघांच्याही नातेवाईकांच्या साक्षीने १२ मार्च रोजी साखरपुड्याच्या कार्यक्रम कळंबोली येथे पार पडला.१ मे रोजी ‘ शुभ मंगल सावधान ‘ मंगलाष्टकांचे सूर कानी पडणार होते.त्यासाठी ललिताच्या कुटुंबीयांनी लग्नाची तयारी सुरु केली होती.लग्न पत्रिका ,कपड्यांचा बस्ता,मानापानाचे कपडे ,मुलाचे कपडे,सोने खरेदी उरकून नातेवाईक,आप्तेष्ट ,मित्रमंडळी आदींना लग्नपत्रिका देवून निमंत्रण देण्याचे काम सुरु होते.

अशावेळी अचानकपणे डोक्यात खुल शिरलेल्या किशोर याने १५ एप्रिल रोजी ललिताला फिरण्याच्या बहाण्याने मुंबईला भेटायला बोलावून तिच्याकडे लग्नात दहा तोळ्याचे गंठण व पाच लाख रुपये रोख हुंडा असेल तरच मी मुंडावळ्या बांधून तुझ्या दारात येईन अशी अट घातली.यावेळी ललिताने त्याला खूपच समजावण्याचा प्रयत्न केला.मात्र त्याने ऐकले नाही.सदरची हकीकत तिने घरी सांगितली असता ललिताचे आईवडील गर्भगळीत झाले.त्यांनी नातेवाईकांच्या मध्यस्थीने समजावण्याचा प्रयत्न केला.मात्र सर्व प्रयत्न असफल झाल्याने अखेर ललिताने पडघा पोलीस ठाणे गाठून भामटा भावी पती किशोर भास्कर वेखंडे,वडील भास्कर शिवराम वेखंडे,भाऊ किरण भास्कर वेखंडे व बळीराम सापळे आदींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.गुन्हा दाखल होताच पडघा पोलिसांचे पथक लेनाड येथे रवाना होवून फसव्या वेखंडे कुटुंबाचा शोध घेत असताना सर्व कुटुंबीय फरार असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे