भिवंडीत 30 लाखांची चिक्की हस्तगत

0

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील गुंदवली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात न्युवेरा वेलनेस व्हेनचर कंपनीच्या गोदामावर कोकण विभागाच्या अन्य व औषध प्रशासन अधिकार्‍यांनी छापा मारून 30 लाख रूपये किमतीचा माल हस्तगत केल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी राजू अकरूपे यांनी दिली. 6 महिन्यांपूर्वी मुंबईतील कंपनीच्या ऑफिसवर प्रशासनातर्फे कारवाई करण्यात आली होती. मात्र चौकशीकामी कंपनीने कोणतीही माहिती दिली नव्हती. अखेर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी गुंदवली येथील कंपनीच्या गोदामावर छापा मारला असता 30 लाख रूपये किमतीचा 730 किलो 232 ग्रॅम वजनाचे पदार्थ जप्त केले. उत्तेजक द्रव्ययुक्त चिक्की असल्याचा संशय प्रशासनातील अधिकार्यांना आहे. शिवाय हे पदार्थ गरोदर महिला, लहान मुले यांच्या आरोग्यास हानीकारक असल्याने सदर चिक्कीचा वापर व विक्री कुठे कुठे केली जाते याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. जप्त केलेल चिक्कीच्या वेष्टणावर आवश्यक माहितीचा उल्लेख नाही त्यामुळे अधिकार्यांचा संशय बळावलेला आहे.

माल प्रयोगशाळेत तपासणीसाठी
क्वॉट्रो इंटरनॅशनल कंपनीचे पुर्णा येथील अरिहंस कॉम्प्लेक्समध्ये गोदाम आहे. माल साठा असलेल्या गोदामावर छापा मारला असता त्यावर उत्पादनाचा पत्ता, महत्त्वाचे पत्ते, बॅच नंबर वगैरे माहिती छापण्यात आलेली नाही. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी निलेश मसरे आणि त्यांच्या सहकारी अधिकार्‍यांनी गोदामातील 10 लाख 24 हजार 846 रूपये किमतीचा माल जप्त करून पुढील कारवाईसाठी प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती अधिकार्यांनी दिली.