भिवंडी । भिवंडी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, दाभाड यांचे कार्यक्षेत्र अफाट आहे. सदर आरोग्य केंद्राच्या अंतर्गत 39 गावे आणि 22 पाडे आहेत. यामध्ये दुर्गम भागात राहणारी आदिवासी कुटुंबे आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेले ग्रामस्थ राहत आहेत. आरोग्य सुविधा उपलब्ध होणारे या भागातील हे एकमेव प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. बाह्यरुग्ण विभागात वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता डॉक्टराची येथे तांराबळ उडत आहे. या आरोग्य केंद्रात किमान आणखी दोन डॉक्टर नियुक्त केले, तर गरजू रुग्णांना चांगल्या प्रकारे औषधोपचाराचा लाभ घेता येईल. ठाणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने याप्रकरणी गांभीर्याने लक्ष घालून रुग्ण सेवेसाठी दाभाड प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांची संख्या वाढवावी, असे रहिवाशांना वाटत आहे.
उपचारविना रुग्ण माघारी
प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या एकच डॉक्टर कार्यरत आहे. त्यांना शासकीय नियमानुसार अंगणवाडीतील मुला-मुलींची आरोग्य तपासणी, उपकेंद्रांना भेटी, तालुका मीटिंगला उपस्थित राहणे आदी कामे करताना डॉक्टरांना तारेवरील कसरत करावी लागत आहे. ही कामे करतेवेळी डॉक्टरांची आरोग्य केंद्रात उपस्थिती नसते. साहजिकच औषधोपचारासाठी लांबून आलेल्या रुग्णांना उपचार न घेता माघारी फिरावे लागते.
ग्रामस्थांची मागणी
गोरगरीब व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या तसेच आदिवासी रूग्णांना खाजगी डॉक्टरांकडून उपचार करून घेणे परवडत नाही. त्यामुळे ते अंगावर आजार काढतात. त्यामुळे कधी-कधी रोग बळावला तर असे रूग्णही दगावतात. यासाठी आरोग्य विभागाने दाभाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्णसेवेसाठी आणखी दोन डॉक्टरांची नव्याने नियुक्ती करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी स्थानिक रहिवाशांची विनंती आहे.