खड्डे दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, मातीमिश्रित भरावामुळे अनेक ठिकाणी चिखल, गणेशभक्तांमध्ये संतापाचे वातावरण
भिवंडी – भिवंडी महापालिका प्रशासनाने कार्यक्षेत्रातील लहानमोठ्या रस्त्यावर पडलेले खड्डे परिणामकारक न बुजविल्याने रहिवाशांना प्रचंड वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. खड्डे वाचविताना वाहनचालकांना अक्षरश: तारेवरील कसरत करावी लागते. रॅबिट, मातीमिश्रित खडी, लहान मोठ्या दगडांनी खड्डे भरले जात असल्याने डांबरी रस्त्याचे अक्षरश: खडीकरणात रूपांतर झाले आहे. मातीमिश्रित भराव रस्त्यावरील खड्ड्यात टाकला जात असल्याने सर्वत्र चिखल झाला आहेे. त्यामुळे यावर्षी भिवंडी शहरात गणरायांचे आगमन खड्ड्यातून होणार आहे.
खड्ड्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूककोंडीची समस्या कायम
महापालिका बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने रस्त्यांवर खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे. पावसाच्या संततधारेमुळे खड्डे बुजवण्याच्या कामात अडथळा निर्माण होत आहे. असे महापालिकेचे अभियंता म्हणतात. पण पावसाची संततधार दोन दिवसांपासून सुरू आहे. त्या अगोदर रस्त्यांवर लहानमोठे खड्डे हे पडलेले होतेच बांधकाम विभागाने खड्डे बुजवण्याच्या कामात का दिरंगाई केली? असा सवाल रहिवाशांचा आहे. डांबर व बारीक खडी याचे मिश्रण रस्त्यांवरील खड्ड्यात टाकून त्यावर रोलर फिरवला असता तर निश्चितपणे थोड्या फार प्रमाणात खडड्े बुजवण्याचे काम झाले असते.
खड्डे बुजवण्याची मागणी
भिवंडी कल्याण, भिवंडी ठाणे, भिवंडी वाडा, भिवंडी पडघा, भिवंडी वसई अशा सर्वच मार्गावर कमी अधिक प्रमाणात वाहतूककोंडी होत असल्याने रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. गणेश उत्सवाच्या तयारीसाठी घरोघरी वेगवेगळे साहित्य बाजारातून आणावे लागतात पण सर्व वेळ हा वाहतूककोंडीमध्येच खर्च होत असल्याने महापालिका आयुक्तांनी रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्याचे आदेश द्यावेत, अशी रहिवाशांची मागणी आहे.