भिवंडी । भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करीत दुपारपासूनच गणेश विसर्जन सोहळा सुरू झाला. लहान, मोठ्या श्रीगणेशाचे तब्बल 10 तासांनी शांततेत विसर्जन पार पडले. यंदा 189 सार्वजनिक तर 11 हजार 130 घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. शहराप्रमाणे ग्रामीण भाग देखील गणेशोत्सव साजरा करायला मागे नव्हता. तेथे सुद्धा 22 सार्वजनिक तर 13 हजार घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना केली होती. कायदा व सुव्यवस्था राखणेकामी 64 ठिकाणी सीसीटीव्ही. कॅमेरे बसवले होते.
वर्हाळा घाटावरील पाण्यात जंतूनाशके न टाकल्याने गणेशमूर्ती विसर्जन करणार्या तरूणांच्या अंगाला खाज येत होती. दुषित पाण्यामुळे त्यांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत होते. कृत्रिम विसर्जन तलाव व्यवस्थित साफ न केल्याने तरूणांच्या अंगावर जखमा झाल्या होत्या
पोलीस बंदोबस्तांत सोहळा
महापालिका प्रशासनातर्फे विसर्जनस्थळी स्वागतकक्ष उभारण्यात आले होते. स्वागत कक्षात उपस्थित असलेल्या महापालिका अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून गणेश विसर्जन मिरवणुकीबरोबर गणेश भक्तांचे स्वागत करण्यात येत होते. सेवाभावी संस्थाकडून पाणपोई व आरोग्य पथके तैनात करण्यात आली होती. भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेचे महापौर जावेद दळवी, उपमहापौर मनोज काटेकर, आयुक्त डॉ. योगेश म्हसे, लोकप्रतिनिधी, विविध पक्षाचे नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते. पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला होता.