रवि इंडस्ट्रीजचे मालक समोर येत नसल्याने वाढतोय संशय ; अविजिता इंटरप्रायझेजच्या मशिनरी, कच्च्यामालासह सह संसार आगीत खाक
जळगाव – रवि इंडस्ट्रीजमध्ये अचानक फटाके फुटण्यासारखा आवाज येत होता, आवाज आल्याने भितीने घरात असलेल्या मुलगा नवीन याला आवाज दिला. तो बाहेर आल्यावर शेजारील कंपनीला आग लागल्याची खात्री झाल्यावर त्याने तत्काळ माझ्यासह पत्नी दोन्ही सूना, तसेच नातवंडांना घरातून बाहेर काढले, वेळीच लवकर प्रकार लक्षात आला म्हणून वाचलो अन्यथा संपूर्ण कुटुंबांची राखरांगोळी असती, अशी आपबिती अविजिता कंपनीचे मालक प्रविण बेहडे यांचे वडील रमेशचंद्र बेहडे यांची बोलतांना सांगितली. एमआयडीसी परिसरातील जी सेक्टरमध्ये अचानक लागलेल्या भिषण आगीत रवि इंडस्ट्रीज तसेच अविजिता इंटरप्रायझेज या कंपन्यांमधील मशिनरीसह साहित्य तसेच कच्चा मालाची राखरांगोळी झाली. दुसर्या दिवशीही आग धुमसत होती. दरम्यान एवढी मोठ्या घटनेला 18 उलटूनही घटनास्थळी औद्योगिक महामंडळाचे अधिकारी तसेच प्रदूषण महामंडळाचे अधिकार्यांनी घटनास्थळी भेट दिली नसल्याचा आरोप बेहडे यांनी केला आहे. दुसरीकडे ज्या कंपनीत आग लागली, त्या कंपनीचे मालक तथा कामगार कुणीही समोर न आल्याने आगीचे कारण अद्यापही गुलदस्त्यात असून रविंद्र पाटील समोर येत नसल्याने नेमके कंपनीत काही अनधिकृत काम होत नव्हते, असाही संशयाचा सूर निघत आहे.
… तर जीवीतहानी झाली असती,
रवि इंडस्ट्रीजमध्ये अचानक स्फोट व्हायला लागले. त्यामुळे आग वाढली, त्यावेळी कंपनीत 10 ते 12 कामगार होते, आग लागल्याचे कळताच तेथील कामगार आपआपला जीव मुठीत घेवून तसेच बाहेर लावलेल्या वाहनांवरुन पळून गेले. याच कंपनीच्या बाजूला नवीन रमेशचंद्र बेहडे व डॉ. विनिता बियाणी रा. मुंबई यांच्या मालकीची अविजिता कंपनी आहे. या कंपनी आवारात बेहडे यांचे घर आहे. घरात मालक नवीन बेहडे, वडील रमेशचंद्र बेहडे, आई प्रेमलता, पत्नी शालू, मुलगी काव्या व मुलगा नवंश तर भाऊ प्रविण बेहडे यांची पत्नी खुशबू असे सर्व घरात होते. वेळीच प्रकार कळल्याने सर्वांना नवीन यांनी इतरत्र हलविले. मध्यरात्रीच्या वेळी घटना घडली असती तर कंपनीत कामगारांसह, बेहडे कुटुंब अशी जीवीतहानी झाली असती. याच आगीत साडेतीन वर्षाच्या काव्याची डोक्यावरील काही केस जळाली असून, नवीन यांनाही आगीमुळे काही ठिकाणी जखमा झाल्या आहेत. आगीमुळे घर जीर्ण तसेच खाक झाल्याने सर्व कुटुंबियांना अयोध्यानगरात मामाकडे हलविण्याचेही बेहडे यांनी सांगितले.
आगीमुळे संसार खाक, घरही झाले जीर्ण
रविवारी सांयकाळी 6.30 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. काही वेळातच भिषण आगीत रुपांतर होवून होत्याचे नव्हते झाले. रवि इंडस्ट्रीज तसेच अविजिता इंटरप्रायझेज या दोन्ही कंपन्या खाक झालेल्या होत्या. अविजिता कंपनीच्या आवारात दोन मजली चार खोल्यांचे घर तसेच खाली कंपनीचे कार्यालय होते. घरात प्रविण बेहडे व नवीन बेहडे हे दोन्ही एकत्रितपणे वास्तव्यास आहेत. घरात टीव्ही, फ्रिज, एसी यासह संसारपयोगी वस्तू खाक झाल्या आहेत. तसेच आगीच्या लोटांमुळे घर जीर्ण झाले आहे. दुसर्या दिवशी या घराचा स्लॅबला काही भाग तसेच भिंतीचा प्लॅस्टर कोळसत होते. सकाळी नवीन बेहडे पाहण्यासाठी गेले असता, स्लॅब कोसळला होता, सुदैवाने ते वाचले. भितीमुळे बेहडे कुटुंबातील कोणीत घरात जावून पाहणी केलेली नव्हती. त्याचप्रमाणे कंपनीतील आवारातील प्लॉस्टिक पाईचा माल दुसर्या दिवशी जळत होता. अविजिता कंपनीच्या पाईपच्या मशिनरी तसेच प्लास्टिक ग्रॅडींगचे मशीन, मोटारी यासह संसार असा एक ते दीड कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. याप्रकरणी प्रविण बेहडे यांच्या खबरीवरुन एमआयडीसी पोलिसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.
दुसर्या दिवशी वीजखांबांवर शॉर्टसर्किटने
आगीच्या घटनेमुळे एमआयडीसी जी सेक्टर परिसरातील सायंकाळी 6 वाजेपासून वीजपुरवठा खंडीत करण्यात आला होता. दुसर्या दिवशी वीज सुरु नव्हती. रविवारी सकाळी वीज खांबावर शॉर्टसर्किट होवून मोठ्याने आवाज येत असल्याने नागरिकांध्ये धडकी भरली होती. तसेच आगीत कंपनीतील जळालेल्या केमिकलमुळे दुर्गंंधी पसरली होती. थांबणेही याठिकाणी अवघड झाले होते. शॉर्टसर्किटमुळे पुन्हा कंपनीत स्फोट तर झाला नाही, या भितीने रस्त्यावरुन ये जा करणारे नागरिकांसह, शेजारील कंपन्याचे कामगार भितीने दचकत होते. थोडक्यात दुसर्या दिवशी कंपनीच्या स्फोटाची भिती कायम होती.
रवि इंडस्ट्रीजमध्ये टूलीन केमिकलचा साठा कसा?
एमआयडीसी जी सेक्टर 45 रवि इंडस्ट्रीज आहे. बेहडे यांनी दिलेल्या माहिती नुसार 20 वर्षापासून ही कंपनी आहे. या कंपनीत ऑईल रिफायनरिंगचे काम सुरु होते. नुकतेच एक वर्षापूर्वी याठिकाणी टूलिन केमिकल वेगळे करण्याचे काम सुरु आहे. टूलिन हे दुषित केमिकल असून त्याचा क्षमतेपेक्षा जास्त साठा या कंपनीत असल्याचेही बेहडे यांनी सांगितले. या केमिकलच्या दुर्गधींने कॅन्सर तसेच मेंदूज्वरसारखे गंभीर आजार होतात. तसेच दुसरीकडे जी सेक्टरमध्ये केमिकलच्या कामाला परवानगीच नाही तर या कंपनीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर केमिकल आले कुठून असाही प्रश्न बेहडे यांनी उपस्थित केला आहे. आगीत ज्याप्रमाणे आठ स्फोट झाले. ते केमिकलच्या टाक्यांचेच होते, सुदैवाने 3000 हजार लीटरची टाकीचा स्फोट झाला नाही, नाहीतर संपूर्ण जी सेक्टरमधील कंपन्या खाक झाल्या असत्या, असेही यावेळी असेही बेहडे म्हणाले.
तीन महिन्यांपूर्वी केली होती तक्रार
रवी इंडस्ट्रीजमधून अविजिता कंपनीच्या आवारात रासायनिक पाणी येत असल्याने, कंपनीत गीतांजली कंपनीप्रमाणे बेन्झो हे भयानक केमिकल असल्याच्या संशयावरुन अविजिता कंपनीचे मालक प्रविण बेहडे यांनी प्रदूषण महामंडळासह, औद्योगिक महामंडळाकडे तक्रार केली होती. मात्र कुठलीही कारवाई संबंधित विभागांकडून करण्यात आली नाही. अर्थपूर्ण व्यवहारातून कारवाई दडपण्यात आल्याचा आरोप करत त्यामुळे भिषण आगीची दुर्घटना घडल्याचेही बेहडे यांनी सांगितले. वेळीच कारवाई झाली असती, तर कंपनीत केमिकल असल्याचे समोर आले असते. परवानगी नसल्याने कारवाईसह ते नष्ट करता आले, व आगीची घटना टळली असती असेही बेहडे यावेळी म्हणाले.
भिषण आगीत मंदिर मात्र जैसे थे;
एवढ्या मोठ्या चार तास भिषण आग सुरु होती. या आगीच दोन्ही कंपन्यांमधील मशिनरीसह संपूर्ण साहित्य खाक झाले. असे असतानाही रवि इंडस्ट्रीज लागूनच असलेले मात्र अविजिता कंपनीच्या आवारातील गणपती तसेच हनुमान या देवतांचे एकत्रित असलेले मंदिर सुरक्षित होते. मंदिरावरील काडी कचराही तसेच भिंतीला कुठलेही नुकसान नव्हते. उलट या मंदिरासमोरील बाजूस घर पेटून पूर्ण खाकही झाले होते. त्यामुळे देवाचे अस्तित्व आजच्या काळातही कायम असून एवढ्या आगीत मंदिराला कुठलेही नुकसान झाले नाही असा सूर यावेळी व्यक्त केली नाही.
कुठल्याच विभागाच्या अधिकार्यांकडून पाहणी नाही.
केमिकल तसेच कंपन्यांचा भिषण आगीचा गंभीर विषय असल्याने प्रदूषण तसेच औद्योगिक महामंडळाच्या अधिकार्यांकडून घटनास्थळाची पाहणी करणे गरजेचे होते. मात्र 18 तास उलटूनही याठिकाणी कोणत्याच विभागाच्या अधिकार्यांनी भेट दिलेली नव्हती. विशेष म्हणजे रवि इंडस्ट्रीजचे मालक रविंद्र पाटील रा. मानराज पार्क हे घटना घडल्यापासून याठिकाणी आलेले नाही. पाटील यांनी त्यांच्या मित्र परिवाराला घटनास्थळी पाठवून माहिती जाणून घेतल्याचे कळते. औद्योगिक महामंडळाच्या कार्यालयात भेट दिली असता, येथील अधिकारी मुंबईला बैठकीला गेले असल्याचे कर्मचार्यांनी सांगितले. तसेच आपल्या विभागाकडून काय कारवाई होईल असे विचारले असता, प्रदूषण विभागाकडे त्यांनी बोट दाखवित ते कारवाई करती, यानंतर आमच्याकडून कंपनी मालकाला नोटीस पाठवून त्याचा खुलास घेण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच संपूर्ण प्रक्रिया पार पाडल्यावरही संबंधित व्यक्ती वजनदार असल्याने त्यांच्यावर कुठलीही कारवाई होणार नसल्याचा धक्कादायक खुलासाही यावेळी बोलतांना औद्योगिक महामंडळाच्या कर्मचार्यांनी करुन टाकला. त्यामुळे दाल मे कुछ काला नही तो पुरी दालही काली है याचा या विभागात प्रत्यत आला. विशेष जी सेक्टरमध्ये केमिकलची परवानगी नसल्याचे येथील कर्मचार्यांनी सांगत स्वतः केमिकल आले कसे? असा आश्चर्यकारक प्रश्न उपस्थित केला. तसेच प्रत्यक्षात वेगळ्या कामासाठी परवानगी घेवून दुसरेच काम याठिकाणी सुुरु असल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
अग्निशमन बंबासह, पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न
आगीची माहिती मिळताच शहरातील महापालिका, जैन इरिगेशन यांच्यासह वरणगाव फॅक्टरी येथून अग्निशमनचे बंब आले होते. एकूण 18 बंबानी पाण्याचा तसेच फोमचा मार केल्यावर तब्बल 4 तासानंतर आग आटोक्यात आली. अग्निशमन विभागाच्या कर्मचार्यांसह एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक रणजीत शिरसाठ, पोलीस उपनिरिक्षक विशाल वाठोर, सहाय्यक फौजदार संभाजी पाटील, अतुल वंजारनी, आनंदसिंग पाटी, रामकृष्ण पाटील, विजय पाटी, किशोर पाटील, सचिन पाटील, निलेश पाटील, गोविंदा पाटील, अतुल पाटील यांनीही जमाव पांगविण्यासह मदतकार्य करत शर्थीचे प्रयत्न केले.