‘भीमाशंकर’ आंबेगाव तालुक्यात?

0

नियोजन विभागाने काढलेल्या शासन निर्णयातील प्रकार : जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

खेड । तीर्थक्षेत्र भीमाशंकर हे खेड तालुक्यात आहे. असे असताना भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर करताना शासनाच्या नियोजन विभागाने काढलेल्या शासन निर्णयामध्ये तीर्थक्षेत्र भीमाशंकर हे आंबेगाव तालुक्यात असल्याचे नमूद केल्याने एकच खळबख उडाली आहे. यावर खेड तालुक्यातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. शासनाला त्यांची चूक निदर्शनास आणून देण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावरून सर्वांनी प्रयत्न सुरू केले आहेत. लोकप्रतिनिधींनी मंत्रालयात संबंधित खात्याच्या सचिवांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे, तर विविध पक्षांच्या प्रमुख पदाधिकार्‍यांनी पुण्याच्या जिल्हाधिकार्‍यांना महसूल विभागाचा भौगोलिक नकाशा दाखवून याबाबतचे निवेदन दिले आहे.

खेडचा आंबेगाव तालुका झाला कसा?
श्रीक्षेत्र भीमाशंकर तिर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या शासन निर्णयातील चुकीबद्दल पुण्याच्या जिल्हाधिकार्‍यांना भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्या वतीने पत्र देण्यात आले आहे. 28 फेब्रुवारी 2018 रोजी ’श्रीक्षेत्र भीमाशंकर तिर्थक्षेत्र, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे विकास आराखड्यास मान्यता देणेबाबत’ अशा आशयाचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. सदर शासन निर्णयात श्रीक्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्र आंबेगाव तालुका कसा झाला? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

शासनाच्या अनेक पत्रव्यवहरात हीच चूक
बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असणारे पवित्र भीमाशंकर मंदिर खेड तालुक्यात असताना एवढी मोठी चूक झाल्याने खेड तालुक्यातील लाखो जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. यापूर्वी देखील शासनाच्या अनेक पत्रव्यवहारात भीमाशंकर खेडऐवजी आंबेगाव तालुक्यात असल्याचा उल्लेख झाल्याचे दिसत आहे. जाणीवपूर्वक अशी चूक करणे सर्वस्वी चुकीचे आहे. याची गांभीर्याने नोंद घेऊन शासनाने तातडीने खेड तालुका, असा उल्लेख केला पाहिजे, अशी मागणी जोर धरत आहे.

गंभीर चुका करणे योग्य नाही!
विकास आराखड्यांतर्गत खेड तालुक्यापेक्षाही अधिक कामे आंबेगाव तालुक्यात होणार असून यापूर्वी झालेली आहेत. त्यास आम्ही कधीही विरोध केलेला नाही. भाविकांच्या दृष्टीने होत असलेल्या सुविधांना आमचा विरोध नाही किंवा यासाठी काम करणार्‍या व्यक्ती किंवा प्रशासकीय अधिकार्‍यांना आमचा विरोध नाही. पण विकास करणे म्हणजे स्थानमहात्म्य, पंरपरा, संस्कृती संपुष्टात आणणे, असा होत नाही. बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असल्यानेच भीमाशंकरला देश व जागतिक पातळीवर महत्व असल्यानेच शासन विकास आराखडयास निधी देत आहे. मात्र, सुधारणा करताना गंभीर चुका करणे योग्य नाही, असे लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे.

त्वरित सर्व चुका दुरुस्त करा
शासकीय दस्तऐवजात ज्या ज्या ठिकाणी श्रीक्षेत्र भीमाशंकर तिर्थक्षेत्र आंबेगाव तालुका असा उल्लख असेल, तिथे खेड तालुका असा करण्याबाबत आपण सूचना देऊन कार्यवाही करावी व तातडीने शासनास कळवावे, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावर भाजपचे जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, राष्ट्रवादी युवकचे राज्य उपाध्यक्ष डॉ. शैलेश मोहिते पाटील, खेड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विजय डोळस, खेड पं.स.चे उपसभापती अमोल पवार, माजी जि. प. सदस्य अनिल (बाबा) राक्षे, सोमनाथ मुंगसे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

प्रस्तावानुसार शासन निर्णय
खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी गुरुवारी (दि. 1) संबंधीत खात्याचे उपसचिव विद्या हम्पय्या यांची मंत्रालयात तातडीने भेट घेऊन झालेली चूक लक्षात आणून दिली. सदरचा प्रस्ताव जिल्हा नियोजन अधिकार्‍यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पाठविलेला असल्याने जिल्हा नियोजन कार्यालातूनच चुकीचे नाव आल्याने ही घटना घडल्याचे यावेळी उपसचिव हम्पय्या यांनी स्पष्ट केले आहे. उपसचिव यांनी तात्काळ जिल्हा नियोजन अधिकार्‍यांना कळवून दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे लवकरच झालेली चूक दुरुस्त करण्याचे उपसचिव यांनी मान्य केले आहे. दरम्यान, त्यानंतर सलग सार्वजनिक सुट्ट्या आल्याने येत्या चार-पाच दिवसात चूक दुरुस्त होणार असल्याचे आ. सुरेश गोरे यांनी सांगितले.