गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचा दावा
मुंबई (निलेश झालटे):– भीमा कोरेगावच्या पार्शवभूमीवर वढू आणि सणसवाडी येथे घडलेला प्रकार हा अत्यंत दुर्दैवी आहे. मात्र हा प्रकार सोशल मीडियावरील चुकीच्या माहितीमुळे घडला असल्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी जनशक्तिशी बोलताना सांगितले. या प्रकरणात सोशल मीडियाचा गैरवापर झाला असल्याचे केसरकर यांनी सांगितले. वढु बुद्रुकमध्ये 100 टक्के शांतता असून येथे बाहेरच्या लोकांनी बॅनर लावले असल्याचे केसरकर म्हणाले. केसरकर म्हणाले गावातील दलित बांधवांचे देखील म्हणणे की आम्ही बॅनर लावले नाहीत. त्यांचीही सामंजस्यांची भूमिका असल्याचे ते म्हणाले. येथील छत्री तोडणाऱ्या 9 लोकांवर एट्रोसिटी दाखल मात्र 50 जनांवर कारवाईचे मेसेज सोशल मीडियावर फिरले. तसेच या गोंधळामध्ये मृत झालेला युवक दलित असल्याचीही अफवा सोशल मीडियातून फिरल्यामुळे स्थिती गंभीर झाली असल्याचे केसरकर यांनी सांगितले. या घटनेत दोन्ही गटांकडून दगडफेक झाली असल्याचे सांगत संबंधित सर्व दोषींवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले.
भीमा कोरेगावला मृत झालेला तरुण दलित नाही!
भीमा कोरेगावला दलित युवकाचा मृत्यू झाला अशी अफवा पसरवण्यात आली मात्र हा मृत दलित नसल्याचे केसरकर यांनी दिली. कुठल्याही समाजाचा तरुण असेल तरी त्या प्रकरणाची चौकशी कडक करून कारवाई केली जाणार आहेच. एक दलित तरुण जखमी आहे, त्याची संपूर्ण काळजी घेतली जात असल्याचे केसरकर यांनी सांगितले. चुकीच्या मार्गाने सोशल मीडियाचा वापर झाला, असल्याचे केसरकर म्हणाले.
पोलिसांकडून कुठेही बळाचा वापर नाही
या घटनेत आणि संपाच्या दरम्यान पोलीस प्रशासनाकडून कुठेही बळाचा वापर केला नाही तसेच पोलिसांमुळेच मोठी अनुचित घटना घडली नसल्याचे केसरकर म्हणाले. केसरकर यांनी सांगितले की, भीमा कोरेगावला यावर्षी 200 वर्ष पूर्ण झाल्याने असल्याने गेल्यावर्षीपेक्षा तिप्पट 3 लाख लोकं आले होते. मात्र चोख बंदोबस्तामुळे कार्यक्रमस्थळी कुठलाही दंगाझाला नाही. या प्रकरणात पोलिसांनी काय केले नाहीत हे चुकीचे असल्याचे सांगत पुण्याचे एसपी या घटनेत चांगले काम करत असून आयजी विश्वास नांगरे-पाटील देखील तिथे ठाण मांडून असल्याचे केसरकर म्हणाले.
दोषींवर कारवाई होणारच
या प्रकरणात ज्या युवकाचा मृत्यू झाला झाला त्याच्या परिवाराला १० लाखाची मदत मुख्यमंत्र्यांनी घोषित केली असून त्याच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्यांवर कडक कारवाई होणार असल्याचे केसरकर म्हणाले. तसेच या दंग्यातज्यांनी गाड्या जाळल्या, दुकाने फोडली त्यांच्यावर देखील कारवाई होणार असल्याचे ते म्हणाले. 13 गुन्हे आतापर्यंत आम्ही दाखल केले असल्याचे ते म्हणाले. ज्या वाहनांचे आणि दुकानांचे नुकसान झाले आहे त्यांना पंचनामा करून नुकसानभरपाई देणार असल्याचेही केसरकर यांनी सांगितले.
औरंगाबादला प्लास्टिक बुलेटचा वापर
औरंगाबादला दीड हजाराचा मॉब आल्याने पोलिसांना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून प्लास्टिक बुलेटचा वापर करावा लागला असल्याचे केसरकर यांनी सांगितले. या घटनेत पोलीस देखील जखमी झाल्याचे केसरकर म्हणाले. चंद्रपूरला माजी आमदार शाम घुडे यांच्या कार्यालयावर हल्ला झाला असून नांदेडला पोलिसांच्या गाडया फोडल्या असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईमध्ये मोर्चे निघाले, रस्ता रोको केले पण पोलिसांनी लगेच वातावरण स्थिर केल्याचे केसरकर यांनी सांगितले. पवई पोलीस स्थानकात दगडफेक होऊन 1 पीआय, 2 पोलीस शिपाई जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. घाटकोपर, चेंबूर, छेडानगर, विक्रोळी, रमाईनगर या भागासोबत दादर, भोईवडा, वरळी काही ठराविक युवकांच्या समूहांनी बंद करण्यासाठी घोषणाबाजी केली आणि या ठिकाणी काही काळ तणाव असल्याचे केसरकर म्हणाले. बाकी राज्यात शांतता असल्याचे केसरकर यांनी सांगितले.