भीमा कोरेगावची दंगल भाजप, संघाचे पाप!

0

अरविंद केजरीवालांचा आरोप

सिंदखेडराजा : दोन समाजांत भांडणे लावून राजकारण करण्याची भाजपमध्ये पद्धत आहे. भाजपचा इतिहास दंगलीचा आहे. भीमा कोरेगाव येथेदेखील भाजप आणि रा. स्व. संघाने दंगल घडवून आणली, असा घणाघाती आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केला. सिंदखेडराजा येथे आपच्या ‘महाराष्ट्र संकल्प’ सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी पुढील वर्षी होणार्‍या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे बिगूल फुंकले. भाजप, काँग्रेसवर टीकास्त्र डागताना केजरीवाल म्हणाले, फोडा आणि राज्य करा अशी नीती वापरत इंग्रजांनी भारतावर राज्य केले. त्यातून पाकिस्तानची निर्मिती झाली. भारतातील शांतता भंग करण्याचे पाकिस्ताने 70 वर्षापासूनचे स्वप्न भाजपने अवघ्या तीन वर्षात पूर्ण केले आहे.

महाराष्ट्र सरकारने शाळा विक्रीस काढल्या!
अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण हा आमचा जन्म सिद्ध अधिकार आहे. तो आम्ही मिळवणारच अशी घोषणा यावेळी ‘आप’कडून करण्यात आली. महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणाचा वसा दिल्ली सरकारने उचलला आहे. 40 हजार कोटींचे बजेट असताना आप सरकार सर्वांना मोफत आणि दर्जेदार शिक्षण देत आहे. महाराष्ट्रात मात्र 3 लाख कोटींचे बजेट असताना सरकारी शाळा विक्रीला काढल्या असल्याचा टोलाही यावेळी केजरीवालांनी लगाविला. शिवाजी महाराजांचे नाव घेत शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. मात्र, अद्याप याची अंमलबजावणी झालेली नाही. भाजप सरकारला शेतकर्‍यांची चिंता नसल्याचे सांगत, दिल्ली सरकारने शेतकर्‍यांना दिलेल्या मदतीची माहिती केजरीवालांनी यावेळी दिली. दिल्लीत सत्तेत येऊन तीन महिने झाले होते. पावसाने संपूर्ण पीक मातीमोल झालेले असताना दिल्ली सरकारने परिस्थितीची पाहणी करून अवघ्या तीन महिन्यांत हेक्टरी 50 हजारांची मदत केली. स्वतंत्र भारतात ही सर्वांत जास्त मदत असल्याचे केजरीवाल म्हणाले. देशभरात स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची गरज असल्याचे सांगत, त्यासाठी सर्व शेतकर्‍यांनी एकत्र यायला हवे असे आवाहनही त्यांनी केले.

कट उधळून लावा : मोदींच्या सूचना
नवी दिल्ली : भीमा कोरेगावसारख्या घटना घडवून समाजात फूट पाडणार्‍यांचे कट उधळून लावण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी भाजप महासचिवांना दिले आहेत. मोदी यांनी भाजपचे महासचिव, राज्यांचे प्रभारी आणि ज्येष्ठ पदाधिकार्‍यांची बैठक 7 लोककल्याण मार्ग येथे घेतली. या बैठकीत पदाधिकार्‍यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.