भीमा कोरेगाव घटनेचे जळगावातही पडसाद

0

जळगाव । भीमा कोरेगाव येथील घटेनेचे पडसाद जळगाव शहरात देखील मंगळवारी उमटले. यात शनिपेठेतील लेंडीनाला पुलासह शिवकॉलनी उड्डाण पुलावर अशा वेगवेगळ्या ठिकाणी एसटी महामंडळाच्या दोन बसेसवर तरुणांच्या टोळीकडून दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत बसेसच्या काचा फुटल्या. दरम्यान, शिवकॉलनी पुलावरील घटनेत मात्र तरुणांनाकडू बसमध्ये पेट्रोल टाकून चालक सीट जाळून बस जाण्याचा प्रयत्न करण्यात आला. पंरतू, तात्काळ चालक वाहकांसह प्रवाश्यांनी पाणी व मातीचा मारा करत आग विझविली. यामुळे सुदैवाने जीवीत हानी टळली.घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलिस अधीक्षक बच्चनसिंह व डिवायएसपी सचिन सांगळे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती हाताळली.

या घटनुळे महामार्गावरील वाहतुक अर्धा ते पाऊण तास ठप्प झाली होती. भीमा कोरेगाव घटनेचे जळगाव शहरात मंगळवारी दुपारी पडसाद उमटून आले. या दोन वेगळ्या ठिकाणी बसेसवर दगडफेक करण्यात येवून वाहनांची नुकसान करण्यात आले. यावेळी पहिला घटना ही शहरातील शनिपेठ परिसरात लेंडीनाला पुलाजवळ घडली.जळगाव-भादली बस (क्र.एमएच.14.बीटी.1600) वरील चालक सोनवणे हे दुपारी प्रवासी घेऊन जळगाव आगारातून भादलीसाठी निघाले. दुपारी 3 वाजेच्या सुमारास शनिपेठ परिसरातील लेंडीनाला पुलाजवळ येताच दहा ते पंधरा जणांच्या टोळीने अचानक बसवर दगडफेक केली. त्यात दोन्ही बाजूच्या काचा फुटल्या. यावेळी लाठ्याकाठ्यांनी देखील काच फोडण्याचा प्रयत्न केला. टोळीने केलेल्या हल्लयामुळे बसमधील प्रवासी विद्यार्थी भयभीत झाले होते. शनिपेठ पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, हल्लेखोर तरूणांची टोळी ही तेथून पसार झाली होती. पुन्हा असा प्रकार घडू नये यासाठी भादलीपर्यंत पोलिस देखील बस सोबत होते.

अन् तरूणांच्या टोळीने केला दगडफेकीस सुरूवात
दुसर्‍या घटना ही शिवकॉलनी उड्डान पुलावर घडली. दुपारी चोपडाकडून जळगावकडे बस क्रमांक एमएच.14.बीटी.1855 घेवून चालक जगतराव लोटन पाटील व वाहक व्ही.टी.कोळी हे येत होते. बसमध्ये 25 प्रवासी बसलेले होते. दुपारी 3.15 वाजेच्या सुमारास बस ही बस जळगाव शहरात आल्यानंतर शिवकॉलनी पुलावर पायी येत असलेल्या दहा ते पंधरा तरूणांनी बसच्या दिशेने अचाकन दगडफेक करण्यास सुरूवात केली. यात दोन्ही बाजूची काच फोडली.

महिलेसह महाविद्यालयीन तरूण जखमी
बसवर अचानक झालेल्या दगडफेकीमध्ये बसमधील प्रवाशी डिगंबर महाजन याच्या हाताला दगड लागला. त्यामुळे तो जखमी झाला आहे. त्याचबरोबर महिला प्रवासी सकुबाई नाना पाटील यांच्या हाताला देखील दुखापत झाली होती. चालक जगतराव पाटील हे देखील किरकोळ जखमी झाले होते. दरम्यान, या घटनेमुळे प्रवाश्यांमध्ये घबराट निर्माण झाली होती.

सुदैवाने जिवीतहानी टळली
हल्लेखोरांनी फेकलेल्या पेट्रोलच्या बाटलीमुळे संपूर्ण चालक सीट जळून खाक झाली. आग जर वाढतच गेली असती तर संपूर्ण बस आगीच्या गर्तेत सापडली असती. त्यामुळे जिवीतहानी होण्याची शक्यता निर्माण झाली असती. परंतु चालक व वाहक यांच्यासह नागरिकांनी तात्काळ आग विझविल्याने हानी टळली. यावेळी बे्रक प्रेशर नळी जळली गेल्यामुळे बस जागेवरच थांबून होती. त्यामुळे क्रेनच्या सहाय्याने बस ही जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात आणण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधिक्षकांसह तहसिलदारांकडून पाहणी
घटनेनंतर हल्लेखोरांनी तात्काळ पळ काढला. घटनास्थळी पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलीस अधिक्षक बच्चन सिंग, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे, तहसीलदार अमोल निकम यांनी भेट देवून पाहणी केली. बसचे झालेले नुकसान त्यांनी पाहिले. यावेळी वाहतुक पोलिसांसह रामानंदनगर व जिल्हापेठ पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले होते.

बस जाळण्याचा प्रयत्न
चोपडा-जळगाव बसवर दगडफेक केल्यानंतर चक्क एका तरुणाने पेट्रोलने भरलेली बाटली बसचालकाच्या केबीनमध्ये फेकली आणि माचिसच्या तली त्या फेकली. यामुळे चालक सीट हे संपूर्ण जळली. काही प्रमाणात पेट्रोल हे चालक पाटील यांच्या अंगावर देखील पडले होते. बसमध्ये आग लागल्याने प्रवासी घाबरले. प्रसंगवधान राखत चालक पाटील व वाहक कोळी यांनी लागलीच आगीवर मातीचा मारा केला. त्यानंतर नागरिकांकडून पाणी आणत आग विझविली. तोपर्यंत हल्लेेखोर तरूण हे पिंप्राळ्याच्या दिशेने पसार झाले.

अर्धा ते पाऊण तास वाहतुक ठप्प
शिवकॉलनी उड्डाण पुलावर बसवर झालेल्या दगडफेकीमुळे महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतुक अर्धा ते पाऊण तास ठप्प झाली होती. वाहनांच्या लांबच-लांबा रांगा लागल्याचे यावेळी दिसून आले. दरम्यान, वाहतुक पोलिसांसह रामानंदनगर पोलिसांनी अर्धा ते पाऊण तासांच्या अथक प्रयत्नानंतर वाहतुक सुरळीत केली. दरम्यान, या घटनेमुळे वाहनाधरकांना ताटकळत उभे रहावे लागले. दगडफेक करणारे तरूण ज्या दिशेने पसार झाले, त्या दिनेशे पोलिस तपास करीत आहेत. यावेळी त्यांचा शोध पोलिस घेत आहेत.