भीमा कोरेगाव घटनेचे पिंपरी-चिंचवडमध्ये पडसाद

0

पिंपरी-चिंचवड : भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद शहरातही उमटले असून पिंपरीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भीमसैनिकांनी निषेध नोंदवत पुणे-मुंबई महामार्गाच्या दोन्ही लेन दुपारी तब्बल साडेतीन तास पूर्ण बंद ठेवल्या. तसेच तीन व चार चाकी वाहनांच्या काचाही फोडण्यात आल्या. दरम्यान, छत्रपती समस्त हिंदू आघाडीचे समितीचे मिलींद एकबोटे व शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा
आंबेडकर चौकात मंगळवारी दुपारी बारापासून भीमसैनिक एकत्र जमा झाले. नंतर त्यांनी महामार्गाच्या दोन्ही लेनवर ठिय्या मांडला. त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. संतप्त जमावाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणा देत संभाजी ब्रिगेड व भिडे गुरुजी यांच्या विरोधात घोषणा दिल्या. या घटनेला भिडे गुरुजी व मिलिंद एकबोटे जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली. जमावाने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप देशपांडे यांनी गुन्हे नोंदवण्याचे आदेश दिले. यावेळी भिडे गुरुजी व एकबोटे यांच्यावर जिवे मारण्याचा प्रयत्न, अ‍ॅट्रोसीटी, दंगल घडवून आणणे, दहशत पसरवणे, हत्यारबंदी असे गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी येथील परिस्थिती नियंत्रणात आणली असून पुणे मुंबई महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरु करण्यात आली आहे.

सावरकर भवनाची तोडफोड
पिंपरीच्या विशाल टॉकिजमधील चित्रपटाचा खेळ संतप्त जमावाकडून बंद पाडण्यात आला. निगडी प्राधिकरण येथील सावरकर भवनाचीही एक काच फोडण्यात आली. या परिसरात रिक्षामधून आलेल्या तीन चार तरुणांनी भवनावर दगडफेक केली. वल्लभनगर आगारात दुपारपर्यंत आलेल्या एसटीबस याठिकाणी थांबविण्यात आल्या असून पोलिसांची सूचना मिळेपर्यंत एकही बस सोडण्यात येणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे.