अद्याप तरी संभाजी भिडेंविरुद्ध ठोस पुरावे सापडले नाहीत!
पुणे : भीमा कोरेगाव दंगलप्रकरणी संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल झाले असले तरी, या गुन्ह्याचा तपास करताना भिडे यांच्याविरुद्ध ठोस असे पुरावे अद्याप तरी सापडलेले नाहीत, अशा प्रकारची माहिती नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर एका वरिष्ठ पोलिस अधिकार्याने दिली. या गुन्ह्यांप्रकरणी पोलिस यंत्रणा व्हिडिओ क्लिप्स, ऑडिओ क्लिप्ससह परिसरातील खबर्यांमार्फत माहिती गोळा करण्यात गुंतलेली आहे. परंतु, अद्यापही त्यांच्या हाती भिडे यांच्याविरोधात ठोस पुरावे मिळालेले नाहीत. तथापि, तपास सुरुच असून, पोलिस पथके पुरावे गोळा करण्यासाठी कामाला लागली आहेत, असेही सूत्र म्हणाले.
आतापर्यंत 600 व्हिडिओ तपासले!
कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारीरोजी जातीय दंगल उसळली होती. त्यात मोठ्या प्रमाणात दगडफेक होऊन हिंसाचार माजविण्यात आला होता. या दंगलप्रकरणी समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे व शिव प्रतिष्ठाण हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यांचा तपास पुणे ग्रामीण पोलिस पथक करत आहेत. या तपासाबाबत माहिती देताना एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले की, भिडे किंवा एकबोटे यांना अटकेचा निर्णय तेव्हाच घेतला जाईल, जेव्हा त्यांच्याविरोधात काही तरी ठोस पुरावा हाती येईल. गेल्या तीन दिवसांपासून पोलिस विविध व्हिडिओ व ऑडिओ क्लीप तपासून पाहिल्या जात असून, अद्याप तरी पोलिसांच्या हाती त्यातून काहीही सापडलेले नाही. जवळपास 600 व्हिडिओ व ऑडिओ क्लीप तपासण्यात आल्याचेही हा अधिकारी म्हणाला.
संशयितांची धरपकड सुरु!
पुणे ग्रामीणचे वरिष्ठ पोलिस अधिकारी 1 तारखेपासून कोरेगाव भीमामध्ये तळ ठोकून आहेत. परिसरातील गावकर्यांकडून दगडफेक करणार्या संशयितांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. परंतु, हे दंगलखोर परिसरातील नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. पोलिसांचे एक पथकही व्हिडिओतील संशयितांची ओळख पटविण्यासाठी कामाला लागले असून, त्यासाठी एक खास पथकच गठीत करण्यात आलेले आहे. अनेक संशयितांना ताब्यात घेऊन त्यांचीही कसून चौकशी केली जात असल्याचे हा वरिष्ठ अधिकारी म्हणाला.